कोल्हापूर : देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून १० टक्के बालके अतिसाराने दगावतात. म्हणूनच अतिसार नियंत्रण पंधरवड्यात जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार बालकांना लाभ देण्यासाठी नियोजन केले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत २८ मे ते ९ जून या कालावधीमध्ये अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा प्रशासनाधिकारी नितीन देसाई, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. विलास देशमुख, महानगरपालिकेचे डॉ. रमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.काटकर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेऊन ज्या उद्देशामुळे शासनाने या कार्यक्रमाची आखणी केली आहे, तो उद्देश सफल व्हावा यासाठी यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे सांगून ओआरएस सॅचेट व झिंक सल्फेट औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. भरारी आरोग्य पथकांमार्फत नियंत्रण करण्यात यावे, अशाही सूचना दिल्या.
या पंधरवड्यामध्ये पाच वर्षांखालील बालकांना २७५९ ‘आशां’द्वारे घरभेटी देऊन ओआरएस पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. ओआरएस व झिंक कॉर्नर प्रस्थापित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४३९७ अंगणवाड्यांमधील व २९४४ शाळांमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बालस्वास्थ्य अभियानांतर्गत हात धुण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.