कोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी एम-पासपोर्ट कार्यप्रणालीद्वारे कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे २१ दिवसांत १९ हजार ४२४ पारपत्र अर्जांची पडताळणी करून ते तत्काळ पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती पासपोर्ट विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगले यांनी मंगळवारी दिली.कोल्हापुरातून साधारणत: वर्षाकाठी सुमारे २० ते २५ हजार नागरिक, विद्यार्थी हे पासपोर्टसाठी अर्ज करतात. अचानक पासपोर्टची गरज लागल्यास, कागदपत्रांची छाननी, त्यातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. धावपळ, वेळ आणि पैसा खर्च होत होता.
परराष्ट्र खात्याकडून कसबा बावडा मार्गावरील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू केल्याने पुण्याला जावे लागत नाही; परंतु पासपोर्टसाठी संबंधित व्यक्तीचा अर्ज पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला गोपनीय विभागाकडून निरोप दिला जातो.
काहीवेळा कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार असल्याने अर्ज पुढे जाण्यासाठी रेंगाळतात, तर काही वेळा संबंधित व्यक्ती पाठपुरावा करीत नसल्याने अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही. या घोळामध्ये पासपोर्ट अर्जांच्या पडताळणीला विलंब होतो.
लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ६० तासांच्या आत पासपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून ते पुढील कार्यवाहीसाठी पासपोर्ट केंद्राला पाठवून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान २४ फेब्रुवारी २०१८ पासून जिल्ह्यात एम-पासपोर्ट कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीमुळे कोणताही पासपोर्ट अर्ज २१ दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहत नाही.