कोल्हापूर : सर्किट बेंचसाठी शेंडा पार्क येथील २२ एकर ५०० गुंठे जागा उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हा प्रशसनाकडून पुणे विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला. सर्किट बेंचसाठी प्रस्तावित जागेच्या वस्तुस्थितीबाबत २३ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.
यावेळी शेंडा पार्क येथील जागेशी संबंधित १३ विविध सरकारी कार्यालयांचा अभिप्राय मागवून त्यांचा परिपूर्ण अहवाल पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना ३० जुलैपर्यंत देण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस, जिल्हा सरकारी वकील अॅड. विवेक शुक्ल यांना दिले होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना विभाग, कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणाने आपला अभिप्राय न दिल्याने हा अहवाल अडकला होता. तो नुकताच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.
त्यानंतर शेंडा पार्क येथे २२ एकर ५०० गुंठे जागा उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मंगळवारी विभागीय आयुक्तांना पाठविला. यामुळे सर्किट बेंचच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे.जागा उपलब्ध झाली असली तरी मुळ सर्किट बेंचच्या मंजूरीची प्रक्रिया मात्र ठप्प आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश रुजु झाल्यानंतर त्यांना राज्य शासनाकडून नव्याने फक्त कोल्हापूरचाच प्रस्ताव देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते परंतू पूर्णवेळ न्यायाधिशच अद्याप नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे शासनाकडूनही नवीन प्रस्ताव सादर झालेला नाही. या प्रश्र्नाला गती देण्यासाठी गणेशोत्सवानंतर पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने दिला आहे.