कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सीपीआर प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता २०९ इतकी झाली आहे.सकाळच्या सत्रात चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाने कळविले होते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आणखी २३ जणांना कोरोनाने पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता २०९ इतकी झाली आहे.
नवे तीन रुग्ण शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांतील
गुरुवारी सकाळी १० पर्यंत १६३८ नागरिकांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यातील नागरिकांना आणि प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या १८२ वर गेली असताना हे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा आलेल्या तीन पॉझिटिव्ह अहवालांपैकी दोन अहवाल हे शाहूवाडी तालुक्यातील असून, एक अहवाल गगनबावडा तालुक्यातील आहे. गगनबावडा तालुक्यातील २५ वर्षांचा युवक असून, शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील २७ वर्षाच्या युवकाचा आणि २३ वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.
सीपीआरसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांची तपासणी करून त्यांच्या नाकातील आणि घशातील स्राव घेण्यात आले होते. बुधवारी रात्री १२९५ आणि गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत ३४३ असे एकूण १६३८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सीपीआर, आयजीएम, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी, हातकणंगले, कागल, भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, अतिग्रे येथील संजय घोडावत हॉस्टेल, ॲपल हॉस्पिटल आणि आधार हॉस्पिटल येथून हे स्वॅब घेण्यात आले होते.