कोल्हापूर : सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील ५६३ पोस्ट आॅफिसमधून ६२ हजार ९१ मुलींच्या नावांची खाती उघडून २९ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधीक्षक ईश्वर पाटील यांनी शुक्रवारी दिली.सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडल्यापासून केवळ १४ वर्षांपर्यंत रक्कम जमा करावयाची असून योजनेचा कालावधी २१ वर्षे किंवा मुलीच्या लग्नापर्यंत आहे. कमीत कमी २५० रु. जमा करून खाते उघडता येते. त्यापुढे १ हजारच्या पटीत रक्कम भरता येते. एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी एक हजार रुपये भरणे बंधनकारक आहे व जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत या योजनेत रक्कम भरता येणार आहे.
या योजनेतील गुंतवणूक ही आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत करमुक्त आहे. हे खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्मतारखेचा दाखला, पालकाचे ओळखपत्र व रहिवाशी दाखल्याची झेरॉक्स आणि पालकाचे दोन फोटो देणे आवश्यक असल्याचेही पाटील यांनी सांगितले.