एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट चलनी नोटा, देशी-विदेशी मद्य व हत्यारे, आदींची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. खबरदारी म्हणून स्थिर सर्वेक्षण पथकाकडून जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नाक्यासह चौका-चौकांत कडक नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दिवसाला ३००० वाहनांची तपासणी केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ४० स्थिर सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकामध्ये पाच असे २०० कर्मचारी दिवस-रात्र नाक्यावर व चौकांत खडा पहारा देत आहेत. या संपूर्ण तपासणीचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या देखरेखीखाली ही पथके काम करीत आहेत. प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकही या पथकांच्या तपासणीवर लक्ष आहे.कोल्हापूर, गगनबावडा, राधानगरी, मलकापूर, पुणे-बंगलोर महामार्ग, किणी टोलनाका, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, सांगली फाटा, हातकणंगले, जयसिंगपूर, इचलकरंजी, हुपरी, कागल, उजळाईवाडी यांसह बारा तालुक्यांच्या सीमारेषांवर पथके तैनात आहेत. या पथकांमध्ये महसूल, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन, आयकर विभाग या प्रत्येक विभागातील कर्मचारी अशी पाचजणांची टीम आहे. या पथकांची दिवस-रात्र ड्युटी आहे. दिवसा २० आणि रात्री २० अशी ४० पथके चोवीस तास वाहनांची तपासणी करीत आहेत. लायसेन्स, वाहनांची कागदपत्रे,तसेच बॅगेची तपासणी केली जात आहे. प्रवाशांची नावे, गाडीमालकाचे नाव, चालकाचे नाव, कोठून आलात, कोठे जाणार आणि कोल्हापुरात येण्याचे कारण काय? असे उलट-सुलट प्रश्न विचारून त्याची नोंद रजिस्टर नोंदवहीमध्ये केली जात आहे.साध्या वेशातील पोलिसांचाही फेरफटकाहत्यारे, मद्याची तस्करी, बनावट नोटा मिळून आल्यास जाग्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जात आहे. तसेच साध्या वेशातील पोलीस शहरभर फेरफटका मारीत प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या संपूर्ण तपासणीचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे.
कोल्हापुरात दिवसाला ३ हजार वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:54 AM