कोल्हापूर : कॉलेजमध्ये वरिष्ठ महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या परंतु, सध्या निवृत्त झालेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ३० प्राध्यापकांची प्रोफेसरशीप शासन व विद्यापीठाच्या गलथानपणामुळे लटकली आहे. हे प्राध्यापक सुटा संघटनेच्या माध्यमातून उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.महाविद्यालयीन पातळीवर अध्यापनाचे काम करणाऱ्या असोसिएट प्रोफेसरमधील दहा टक्के पदे विविध निकष पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रोफेसरशीप देण्यात यावी असा शासन आदेश २०१० मध्ये झाला आहे. त्यानुसार विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांकडून अशा पात्र प्राध्यापकांचे अर्ज मागविले होते.
असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर व प्रोफेसर अशी ही पदोन्नती आहे. असोसिएट प्रोफेसरपासून प्रोफेसर व्हायचे असेल तर संबंधित प्राध्यापकास १ जानेवारी २००६ पासून असोसिएट प्रोफेसर म्हणून तीन वर्षे सेवा झालेली असली पाहिजे, त्यांचे आयएसबीएन नंबर असलेल्या संशोधन नियतकालिकात पाच शोधनिबंध प्रसिद्ध झाले पाहिजेत व ज्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर(एपीआय) हा रिसर्च कॅटेगरी (थर्ड कॅटेगरी)मध्ये प्रत्येक वर्षी कमीतकमी त्यांना २० गुण हवेत.
हे निकष पूर्ण केलेल्या प्राध्यापकांकडून विद्यापीठाने प्रस्ताव मागविले. त्यानुसार २०१० पासूनच हे प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर झाले. हे प्रस्ताव सादर झाल्यानंतर विद्यापीठ व शासनाचा प्रतिनिधी असलेल्या समितीकडून या प्राध्यापकांच्या मुलाखती होतात.
या मुलाखती वेळेत घेण्याची जबाबदारी विद्यापीठाची होती. विद्यापीठाने यापूर्वी दोन वेळा अशा मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या व मुलाखती दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी अचानक रद्द केल्या. परवाच्या २५ ते २७ मे रोजीही या मुलाखती पुन्हा आयोजित केल्या.
त्यानुसार या प्राध्यापकांना मुलाखतीची रितसर पत्रेही आली. परंतु, प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दारात गेल्यावर तुम्ही आता सेवेत नसल्याने तुमच्या मुलाखती घेता येणार नाहीत, असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. त्यामुळे जेवणाच्या ताटावरून उठविण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्राध्यापकांतून व्यक्त झाल्या.
ज्यावेळी आम्ही सेवेत होतो तेव्हा तुम्ही मुलाखतींचे आयोजन केले नाही आणि आता तुम्ही सेवेत नाही म्हणून तुम्हाला प्रोफेसरशीप देता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याविरूद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे संबंधित प्राध्यापकांकडून सांगण्यात आले.प्रोफेसरशीपचे फायदेअसोसिएट प्रोफेसरमधून प्रोफेसर म्हणून संधी मिळाल्यास अकॅडमिक ग्रेड पे मध्ये एक हजार रुपयांचा फरक पडतो. महागाई भत्ता व अन्य भत्ते विचारात घेता दरमहा अडीच हजार रुपये जास्त मिळू शकतात. ही सर्व रक्कम ते जेव्हा या पदासाठी पात्र झाले त्या तारखेपासून मिळतात. शिवाय प्रोफेसर हे मानाचे पद आहे.