कोल्हापूर : युवा मंडळ सशक्तीकरण अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्राद्वारे महिन्याभरात किमान ३०० युवा मंडळे स्थापन करण्यात येतील, अशी माहिती केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रमोद हिंगे यांनी दिली. या मंडळाच्या माध्यमातून सकारात्मक कामावर अधिक भर देऊन प्रभावी जनजागृती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी(महसूल अरविंद लाटकर होते. हिंगे म्हणाले, युवा मंडळ सशक्तीकरण अभियानातून जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून किमान ३० स्वामी विवेकानंद युवा मंडळे स्थापन करण्यास प्राधान्य दिले आहे.
एका मंडळात किमान ३० युवकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. हे युवक १५ते २९ वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित गावातील सर्व जातिधर्मांच्या तरुणांचा यामध्ये सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. मंडळाच्या माध्यमातून गाव पातळीवर प्रभावी जनजागृतीचे काम केले जाणार आहे. यासाठी युवक-युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.बैठकीत नेहरू युवा केंद्राच्या आगामी आराखड्यावर चर्चा करण्यात आली. केंद्राचे लेखापाल आनंद कुलकर्णी यांनी स्वागत केले. संजय कुरणे यांनी आभार मानले. यावेळी सल्लागार समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.