कोल्हापूर: पन्हाळगडावरुन सांगलीला शिवज्योत घेऊन जाणाऱ्या वाहनास नागाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची तसेच अपघातील जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने ५ लाखांची मदत पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केली.या अपघातात यातील ५ विद्यार्थी ठार तर १८ जखमी झाले आहेत. जखमीमधील तिघे गंभीर आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. पालकमंत्री पाटील यांनी या दुर्देवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करुन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहिली.
अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत जखमी विद्यार्थ्यांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया तसेच औषधोपचारासाठी जे जे करावे लागेल ते केले जाईल, अशी ग्वाही दिली.
सीपीआरमधील डॉक्टरांनी यासाठी सर्व सहकार्य करावे, शस्त्रक्रिया व अन्य औषधांसाठी जी जी मदत लागेल, ती मदत केली जाईल. जखमी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार प्रसंगी खासगी दवाखान्याचीही मदत घेतली जाईल. त्यासाठी येणारा सर्व खर्च केला जाईल असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.