कोल्हापूर : कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील शिवाजी पूलावरुन शुक्रवारी (दि.२६)रात्री पावणे बाराच्या सुमारास मिनी बस क्रं. एमएच-१२ एनएक्स ८५५० वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपयाची मदत देण्यात येईल, अशी घोषणा महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे केली.अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी, ‘सीपीआर’ रुग्णालयाला भेट दिली. यावेळी महापौर स्वाती यवलुजे, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहू महाराज वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, करवीरचे तहसिलदार उत्तम दिघे आदी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, आजरा तालुक्याच्या दौरा आटोेपून कोल्हापूरच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावरुन येत असताना या दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे आपण तात्काळ घटना स्थळी पोहचलो. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधिक्षक संजय मोहीते व आपत्ती व्यस्थापनाची टीमही घटनास्थळी पोहचली. या भागातील नागरीकही तात्काळ मदतीसाठी घटना स्थळी धावले. मदत कार्य तात्काळ सुरु केल्याने जखमींना वेळेत उपचार मिळाले. पहाटे साडे तीनच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने मिनी बस पाण्याबाहेर काढण्यात आली.ते पुढे म्हणाले, या अपघातात बस मधील एकूण १६ जणापैकी १३ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ सि. पी. आर मध्ये दाखल करण्यात आले होते. मृताच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयाची मदत राज्य शासनातर्फे करण्यात येईल. त्याचबरोबर संबंधितांना विविध विमा योजनांचाही लाभ मिळवून देण्यात येईल.
सि. पी. आर मध्ये उपचार घेत असलेल्या जखमींना आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णांलयातही उपचाराची तयारी प्रशासनातर्फे ठेवण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकांनी पुणे येथे उपचारासाठी हलविण्याची विनंती केल्यानुसार त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली. तसेच पुणे येथेही आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल.