कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बालगृह संस्थांमध्ये चालू वर्षी ५७ मुला-मुलींनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती. यापैकी ५४ मुला-मुलींनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या बालगृहांतील मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के आहेत.वाय.डी. माने बालगृहामधील एका विद्यार्थ्यांने ९१ टक्के, देवचंद शहा बालगृहामधील एका विद्यार्थ्यांने ८५ टक्के, मुलांचे निरीक्षणगृह, कागल आणि मुलींचे निरीक्षणगृह, कोल्हापूर येथील एकेक विद्यार्थ्यांना ८0 टक्के गुण मिळाले आहेत. इतर मुला-मुलींनीही चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे.काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या या मुला-मुलींना बालगृहांमध्ये बालकल्याण समितीमार्फत प्रवेश दिला जातो. त्यामुळे बिकट परिस्थितीतून आल्यानंतर संस्थेत राहून असे यश संपादन करणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. समस्याग्रस्त कौटुंबिक वातावरणातून बालगृहांत दाखल झालेल्या या मुला-मुलींच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.देवचंद शहा बालगृहातील १३ पैकी १२, वाय.डी. माने बालगृहातील १२ पैकी १२, कागल येथील निरीक्षणगृहातील ८ पैकी ७, अनिकेत निकेतनमधील ४ पैकी ३, कोल्हापुरातील मुलींच्या निरीक्षणगृहातील २ पैकी २, मुलांच्या निरीक्षणगृहातील ६ पैकी ६, मुलींच्या बालगृहातील १0 पैकी १0 तसेच अवनि बालगृहातील २ पैकी २ विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. आभास फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल देसाई यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.बालकल्याण संकुल संचलित डॉ. सर्वपल्ली निरीक्षणगृह, कन्या बालगृह, कन्या निरीक्षणगृह आणि अनिकेत निकेतन बालगृहातील एकूण २२ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती.
या बालगृहातील हरीश गजानन पाटील (८१ टक्के), ऋतुजा संजय चव्हाण (८0), कोमल राजाराम शिंदे (७५), विद्या संजय लव्हटे (७२), अश्विनी दत्ता साळे (६८), आरती संजय शिंदे (६७), सुप्रिया सुभाष नाईक (६६), सुफियान मेहबूब शेख (६५), सुमित सर्जेराव इंगळे (६४), यश सचिन राणे (६४), दिव्या यशवंत कांबळे (५७), पूनम राजू सावंत (५५), शुभम परशुराम खोत (५५), भाग्यश्री सुरेश सुतार (५४) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
या विद्यार्थ्यांना शाळेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तसेच संबंधित शाळेतील शिक्षकांचेही सहकार्य लाभल्याची माहिती बालगृहाच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी दिली आहे.