कोल्हापूर : राज्यातील एकही रूग्ण पैशाअभावी आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही या दृष्टिने आवश्यक ती व्यवस्था राज्य शासनाने प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वसामान्य, गोरगरीब लोकांच्या उपचारांसाठी ६५० कोटी रूपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय, मुंबई यांच्या वतीने व श्रीमंत छत्रपती शाहू कारखाना लिमिटेड कागल, राजे विक्रमसिंह घाटगे फांऊडेशन तसेच को. ऑपरेटीव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी कक्ष प्रमुख, डॉ. ओमप्रकाश शेटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, आडीचे परमात्मराज महाराज, निडसोशीचे श्री शिवलिंगेश्वर स्वामी, गोकूळचे संचालक बाबा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.राज्य शासनाने गोर-गरीब जनतेसाठी आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून १२०० आजारांसाठी दीड लाखाची मदत केली जात आहे. याशिवाय दुर्धर आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सहाय्य केले जात आहे.
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून ४०० शालेय विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहेत. यामधील ५७ विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया मुंबई येथे करण्यात येणार असून १६ रूग्णांची पहिली बॅच मुंबईला पाठवली आहे. ६ जणांवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून उर्वरीत मुलांवर प्राधान्याने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
हा सर्व खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा बरोबरच वेगवेगळया ट्रस्टमधून करण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही गरजवंत उपचारापासून वंचित राहणार नाही. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक गरजवंताला वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी महाराणी ताराराणी पुतळ्याजवळ असणाऱ्या कावळानाका सर्किट हाऊसमधील आपल्या कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रत्येकाला मदत मिळेल यासाठी कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. शासनानेही आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
नामांकित हॉस्पीटलमध्ये गरीबांसाठी बेड उपलब्ध ठेवणे बंधनकारक केले आहे. सी.पी.आर. मध्ये होत असलेल्या या शिबीरामधून २ डी इको व ह्दय रोग तपासणी शिबीरामधून ज्या रुग्णांना मुंबई, पुणे येथे उपचार होणे आवश्यक आहे त्यांना रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांच्या राहण्याच्या खर्चासह सर्व मदत उपलब्धे करुन देण्यात येत आहे.मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी कक्ष प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, राज्यातील गोरगरीब माणसाला आरोग्य सेवा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यावर शासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पैशाअभावी उपचार न मिळणे हे अत्यंत दुख:दायक असून असे होऊ नये यासाठी मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.
पूर्वी २५ हजार रुपये असणाऱ्या वैद्यकीय मदतीच्या रकमेत वाढ करुन दीड लाखापर्यंत करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते. या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे साडे सहाशे कोटी रुपये गेल्या तीन वर्षात दिले आहेत.
म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून जिल्हृयातील गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला आहे ही सर्वार्थाने महत्वाची बाब आहे. हे महाआरोग्य शिबिर हे ऐतिहासिक शिबिर असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.प्रारंभी म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात या शिबिराचा उद्देश विषद केला. या कार्यक्रमास श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, निवेदिता घाटगे, गोकुळचे माजी चेअरमन रणजित पाटील, तहसिलदार किशोर घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व वैद्यकिय अधिकारी आणि नागरीक यांच्यासह शिबीरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.