कोल्हापूर : गुंतवणूकदारांनी काढलेल्या मोर्चानंतरही ए. एस. ट्रेडर्सचे कोल्हापुरातील एकही कार्यालय सुरू झालेले नाही. ए. एस. ट्रेडर्सची कार्यालये आणि व्यवहार पुन्हा सुरू करावेत, यासाठी गुंतवणूकदार बुधवारी (दि. ३०) रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदनेही देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने गुरुवारी (दि. १) ए. एस. ट्रेडर्सच्या कार्यालयांमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र या कंपनीचे एकही कार्यालय अजूनही सुरू नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. ए. एस. ट्रेडर्सची सर्व कार्यालये गेल्या आठवड्यापासून बंदच आहेत.गुंतवणुकीची रक्कम आणि परतावे टाळण्यासाठी कंपनीकडूनच कार्यालये बंद ठेवली जात असल्याचा संशय तक्रारदार गुंतणूकदारांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गेल्या आठ-दहा दिवसांपासून कंपनीचे संचालक आणि एजंटांचे मोबाइल बंद असल्याने गुंतवणूकदारांची घालमेल वाढली आहे.स्थळ - शाहूपुरी, दुसरी गल्लीए. एस. ट्रेडर्स कार्यालयवेळ - गुरुवारी दुपारी १२.२०राधाकृष्ण मंदिराशेजारी असलेल्या इमारतीवर ए. एस. ट्रेडर्सचा फलक आहे. जिन्यातून पहिल्या मजल्यावर जाताच कार्यालयाचा दरवाजा कुलूपबंद असल्याचे दिसते. २४ नोव्हेंबरपासून हे कार्यालय बंद असल्याचे बाजूच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. कार्यालयाच्या दरवाजावर वकिलांची नोटीस आहे. फ्लॅटमालकाने २५ नोव्हेंबरला पाठवलेल्या नोटिसीमधून २ डिसेंबरपर्यंत फ्लॅट रिकामा करण्याची सूचना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नोटिसीमध्ये कंपनीवर दाखल झालेला गुन्ह्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दिवसभरात ३० ते ४० गुंतवणूकदार हेलपाटे घालून निघून जातात, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
स्थळ : शाहूपुरी गवत मंडई, स्टर्लिंग टॉवरए. एस. ट्रेडर्स समूहातील ट्रेड विंग्स सोल्युशनचे कार्यालयवेळ : गुरुवारी दुपारी १२.४०विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांच्या काॅर्पोरेट कार्यालयांची गर्दी असलेल्या स्टर्लिंग टॉवरमध्ये दुसऱ्या मजल्यावर ए. एस. ट्रेडर्सच्या ट्रेड विंग्स सोल्युशनचे कार्यालय आहे. २४ नोव्हेंबरपासून या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील कंपनीच्या नावाचे फलक गायब आहेत. बाहेरच्या बाजूला असलेले शेअर बाजारातील धावणाऱ्या बैलाचे ट्रेड विंग्स सोल्युशनचे भलेमोठे बोधचिन्ह लक्ष वेधून घेते. या कार्यालयात नेहमी वर्दळ असे. पण गेल्या आठवड्यापासून या कार्यालयाकडे फारसे कोणी फिरकलेले दिसले नाही, असे बाजूच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
स्थळ - पितळी गणपती मंदिर परिसरदि एम्पायर टॉवरट्रेड विंग्स सोल्युशनचे कार्यालयवेळ : दुपारी १.१०कंपनीचा झगमगाट दाखवणाऱ्या या कार्यालयाचे शटर सध्या बंद आहे. प्रवेशद्वारालाच काचेचा दरवाजा, दरवाजावर सोनेरी रंगातील कंपनीच्या नावाची अक्षरे, बाजूला मोठ्या अक्षरांतील कंपनीचे नाव आणि शेअर बाजारात धावणाऱ्या बैलाचे बोधचिन्ह आकर्षित करते. ए. एस. ट्रेडर्सच्या समूह कार्यालयांपैकी पितळी गणपती मंदिर परिसरातील कार्यालयात नेहमीच गुंतवणूकदारांची वर्दळ असायची. २४ नोव्हेंबरपासून या कार्यालयाला टाळे आहे. पुण्यातील काही गुंतवणूकदारांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालय बंद केले होते. तेव्हापासून हे कार्यालय बंदच असल्याचे एम्पायर टॉवरमधील सुरक्षारक्षकांनी सांगितले.