कोल्हापूर : येणाऱ्या प्रेक्षकाला चित्रपटातून ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभूती हवी असते. कथानकानुरूप बनविलेले नेपथ्य कलादिग्दर्शन रसिकांना भावते. त्यातून चित्रपटाची सौंदर्यानुभूती मिळते. ही भव्यदिव्यता कलामहर्षी बाबूराव पेंटर, भालजींच्या चित्रपटांपासून चालत आली आहे. आज डिजिटल आणि स्पेशल इफेक्टचे युग असले तरी मानवी भावनांचा आविष्कार, कलेचे संचित सोबत ठेवून नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, असे मत प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गुरुवारी व्यक्त केले.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, चित्रपटाचे कथानक डोळ्यांसमोर ठेवून त्याचे नेपथ्य आणि कलादिग्दर्शन केले जाते.
बाबूराव पेंटर यांनी साकारलेली मयसभा समजण्यासाठी माझे दीड वर्ष गेले. आज सर्वांना ‘बाहुबली’ चित्रपटाचे कौतुक असले तरी भालजींच्या ‘छत्रपती शिवाजी’ किंवा ‘चित्रलेखा’ सारख्या चित्रपटांच्या भव्यतेपुढे आणि सौंदर्यापुढे ते थिटेच पडेल. त्यांच्या चित्रपटांची भव्यता पाहिल्यानंतर वाटते की आपण काहीच केले नाही. मी करीत असलेले काम माझ्यासाठी तपस्या आणि ध्यास आहे.मी ज्या संघर्षातून पुढे आलो, तो संघर्ष नव्या पिढीच्या वाटेला येऊ नये यासाठी मुंबईत भव्य स्टुडिओ उभारण्यात आला आहे. त्याद्वारे नव्या पिढीला व्यासपीठ मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनविण्यात येणार असून, त्याचे लेखन आत्ता पूर्ण झाले आहे.
अमेरिकेतील तंत्रज्ञांच्या साहाय्याने त्याचे चित्रीकरण करण्यात येणार असून, शिवाजी महाराजांची ओळख जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. चंद्रकांत जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
इतिहासाचे विकृतीकरण ही मार्केटिंग स्ट्रॅटेजीच‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाबद्दल ते म्हणाले, इतिहासातील व्यक्तिमत्त्वांना आपण देवासमान मानतो. त्यांनी गाजविलेल्या पराक्रमाला आणि कर्तृत्वाला विकृत रूपात दाखवून नागरिकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणालाही नाही.
पद्मावती तसेच बाजीराव मस्तानी, छत्रपती शिवाजी महाराज या मालिका बनविताना मी त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला. सत्यतेत मोठी ताकद असते. ते पाहण्यासाठी रसिकांनी चित्रपटगृहापर्यंत येण्यासाठी खोट्या मसाल्याची किंवा प्रतिमा बदलण्याची गरज नसते. चित्रपटाबद्दलसुरू असलेला वाद ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. ‘बॅड पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’ या फंड्यानुसार चित्रपटाचा प्रवास सुरू आहे.