सरदार चौगुलेकोल्हापूर /पोर्ले तर्फ ठाणे : सकाळची वेळ...गेले दोन महिने घराभोवती शत्रूसारखा घिरट्या घालणारी नागिण बिळात गेल्याचे त्यांनी पाहिले..आणि त्याला मारण्याच्या इराद्याने, त्यांनी बिळात डोकावून पाहिलं तर त्या सापाजवळ अंड्यांची चुंबळ दिसली. मग मात्र त्यांच्यातील माणुसकीला पाझर फुटला आणि सर्पमित्रांना बोलावून नागिणीसह अंड्यांना जीवदान दिले. करवीर तालुक्यातील वाकरे येथील तुकाराम कर्पे यांच्या कुटूंबाने वन्यजीवाबाबत दाखवलेल्या कृतज्ञतेचे कौतुक होत आहे.सापाच्या जातीतील किंग कोब्राचाअपवाद सोडला तर सर्वसामान्य सर्वच साप निसर्गाच्या पोषक वातावरणात अंडी घालून निघून जातात ; परंतू वाकरे येथे शेतवाडीत राहणाऱ्या तुकाराम वर्पे यांच्या घराजवळ गेले दोन महिने सापांच्या अंड्याजवळ राहणाऱ्यां एका नागिणीने पिलांचे संरक्षण कवच बनून पहारा देत या समजूतीला धक्का दिला आहे.सोमवारी सकाळी ती नागिण बिळात शिरताना वर्पे यांना दिसली. मुलगा संदिपने बॅटरीच्या उजेडात बिळात डोकावले तर त्या नागिणीशेजारी अंड्यांची चुंबळ दिसली. मग मात्र त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवत पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील सर्पमित्र दिनकर चौगुले, विवेक चौगुले, कृष्णात सातपुते, अभिजीत पाटील (जाफळे) यांना पाचारण केले. त्यांच्या मदतीने त्या नागिनीसह एकुण २१ अंडी बिळातून बाहेर काढण्यात आले.
अंडी बाहेर काढताना अंड्यांच्या कवचातून बुडबुडे बाहेर येत असल्याचे जाणवत होते. पिलांचे दिवस भरल्याने पोर्ले येथील सर्पमित्रांनी अंडी उबवण्यासाठी विशिष्ट वातावरण निर्मिती केली आणि दोन दिवसात ती अंडी उबवू देऊन पिल्लांचा निपज केला.सर्पमित्रांनी नागिणीसह या २१ पिलांना पन्हाळ्याचे वनरक्षक ईश्वर जाधव, वनमजूर तानाजी लव्हटे यांच्या साक्षीने सुरक्षित वनक्षेत्रात सोडून दिले.अन्नसाखळीचा असाही अनुभव...कॉमन कोब्रा (नाग) वर्षातून एकदा अंडजद्वारे पिलांना जन्म देतात. मार्च महिन्यात साप अंडी घालतात. त्यानंतर अंडी उबवायला ५५ ते ६० दिवसाचा कालावधी लागतो. मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात विशिष्ट वातावरणात अंडी ऊबवून पिल्ली बाहेर पडतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला सापांच्या पिल्लांची निपज होते लहान बेडकांसह अन्य भक्षकांची निपजही याच दरम्यान होते. त्यामुळे लहान सापांच्या भक्ष्याचा प्रश्न निसर्गच मिटवितो. निसर्ग चक्रातील अन्नसाखळीचे हे जिवंत उदाहरण आहे.
वन्यप्राणी व पशूपक्षी लहान पिल्लांचे मोठे होईपर्यंत संगोपन करतात आणि त्यानंतरच त्याला मनसोक्त फिरण्यासाठी सोडून देतात. परंतू सर्वसामान्य सापाच्यांत (अपवाद किंग कोब्रा) अंड्याजवळ थांबून ती उबवण्याची पध्दतच नाही; परंतू वाकरे येथील अंड्याजवळ थांबलेल्या या नागिणीने दोन महिने थांबून मातृत्व सिध्द केले आहे.दिनकर चौगुले,सर्पमित्र, पोर्ले तर्फ ठाणे