कोल्हापूर : शिवाजी पुलावरून मिनीबस पंचगंगा नदीत कोसळून घडलेल्या भीषण अपघाताच्या तपासाची चक्रे बसचालकाच्या भोवती फिरत आहेत. ही मिनीबस आॅगस्ट २०१७ मध्ये नवीनच खरेदी केली असल्याने तसेच अपघातानंतर बसचा चक्काचूर झाला असल्याने तांत्रिक दोष काढणे अवघड असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाºयांचे म्हणणे आहे.दरम्यान, अपघातापूर्वी पन्हाळा येथील वाघबीळ घाटात ही बस किती वेळ थांबली, त्यावेळी चालक महेश कुचेकर याच्यासोबत आणखीकोण गाडीतून उतरले? याच्या चौकशीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस यंत्रणा सरसावली आहे. त्यातून धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.अपघातापूर्वी शिवाजी पुलावर मिनीबसच्या समोर कोणतेही वाहन आडवे आले नसताना या बसने ‘यू टर्न’ कसा घेतला, या दिशेने यंत्रणा तपास करत आहेत.चालकाने मद्यप्राशन केले होते का? याबाबत त्याच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसांत मिळणार असल्याची माहिती पोलिसांंनी दिली आहे.मिनीबसचा चालक महेश कुचेकर याने जुलै २०१७ मध्ये कुर्डूवाडी (ता. अकलूज जि.सोलापूर ) येथून शिकाऊ चालक परवाना काढल्याची माहिती पुढे आली आहे.
कोल्हापूर अपघात : ‘त्या’ मिनीबसचा चालक होता शिकाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 4:36 AM