कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पलची ओळख जगभर झाली आहे; त्यामुळे कोल्हापुरात भाविक आणि पर्यटक आल्यानंतर त्यांचे पाय आपसूकच पापाची तिकटीकडे वळतात; पण मोठमोठे खड्डे, भररस्त्यात पार्र्किंग आणि वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे या मार्गावरून चालणेही जिकिरीचे बनले आहे; त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र याकडे ना महापालिका प्रशासनाचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे.‘कोल्हापूरची चप्पल ओळ’ म्हणून स्वातंत्र्यापासून या मार्गाची ओळख आहे. त्या काळी मोजकी चप्पल दुकाने होती. आता इथे शंभरच्या वर दुकाने झाली आहेत. प्रामुख्याने शनिवारी व रविवारी, सुट्टीच्या काळात आणि सणावेळी या रस्त्यावर भाविकांसह पर्यटकांची गर्दी असते.
कोल्हापुरी चप्पलची ओळख जगभर आहे; पण कोल्हापुरातील चप्पल लाईनच्या या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरून जाताना पादचाऱ्यांसह वाहनधारकांनाही कसरत करीत जावे लागत आहे. (छाया : नसीर अत्तार)चार वर्षांपूर्वी शिवाजी चौक ते पापाची तिकटी या रस्त्याचे डांबरीकरण झाले. परंतु, आता या रस्त्याची चाळण झाली आहे. याचे कारण म्हणजे हा मार्ग कोकणाला जोडणारा असल्याने त्यावरून अहोरात्र वर्दळ आणि वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. याचा त्रास पादचाऱ्यांसह वाहनधारकांना होत आहे. मात्र या रस्त्याकडे महापालिकेसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याच्या भावना शहरवासीयांतून उमटत आहेत.या चाळणरस्त्याचा त्रास येथील व्यावसायिकांना होत आहे. येथील छोटे-मोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे आहेत. साधारणत: तीन बाय चार फूट असे मोठे खड्डे आहेत. ते चुकविताना अपघात होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या दुतर्फा पूर्वी गटारी होत्या. त्या बुजल्याने पाणी रस्त्यात मुरून तो खराब झाला आहे.
शिवाजी चौक ते पापाची तिकटी या रस्त्याचे लवकरच पॅचवर्क करण्यात येणार आहे. विशेषत: या रस्त्याच्या दुतर्फा गटारी नसल्याने पाणी मुरते. त्यामुळे तो लवकर खराब होतो. तो संपूर्णपणे सिमेंटचा करण्याची गरज आहे.- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, कोल्हापूर महापालिका.
खराब रस्त्यामुळे धुलिकण येत आहेत. रस्त्याची चाळण झाल्याने किरकोळ अपघात होतात आणि पर्यटकांकडून नाराजीही व्यक्त होते.-विनोद सातपुते , चप्पल विक्रेते, कोल्हापूर.