कोल्हापूर : उसाची एफ. आर. पी. अधिक २०० रुपये असे एकरकमी पैसे व्याजासह द्यावेत, या मागणीसाठी लक्ष्मीपुरीतील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या सहाहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.
त्या विरोधात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते लक्ष्मीपुरी येथील साखर सहसंचालक कार्यालयासमोर आले. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना वाहनातून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांची परवानगी न घेता आंदोलनाचा प्रयत्न केल्याने माणिक शिंदे यांच्यासह अजित पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील, बाळासाहेब मिरजे, संभाजी चौगुले, आदी कार्यकर्त्यांना मुंबई पोलीस कायदा कलम ६८ नुसार ताब्यात घेऊन व कलम ६९ नुसार ताकीद देऊन सोडून देण्यात आले.