कोल्हापूर : शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे बिंदू चौकात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता ‘शिक्षणमंत्र्यांची वाट पाहण्याचे’ आंदोलन केले जाणार आहे.कमी पटाच्या शाळा बंद करणे आणि शाळांचे कंपनीकरण या शासनाच्या धोरणा विरोधात गेल्या चार महिन्यांपासून कोल्हापुरात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे जनआंदोलन सुरू आहे.
पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आंदोलनकर्ते हे कोल्हापूरकरांना चुकीची माहिती देत आहेत. त्यासह ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची दिशाभूल आंदोलनकर्त्यांनी केली असल्याचे सांगितले तसेच आंदोलनकर्त्यांनी चर्चेसाठी बिंदू चौकात यावे, असे आव्हान दिले होते.
कृती समितीने हे आव्हान स्वीकारून चर्चेसाठी तारीख आणि वेळ कळवावी यासाठीचा ई-मेल दोनवेळा शिक्षणमंत्र्यांना पाठविला. याबाबत शिक्षणमंत्र्यांनी काहीच कळविले नाही.
त्यामुळे समितीने बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता बिंदू चौकात यावे, असे आवाहन ई-मेलद्वारे केले. त्यानुसार समिती ‘शिक्षणमंत्र्यांची वाट पाहण्याचे’ आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे समन्वयक अशोक पोवार, रमेश मोरे यांनी दिली.