कोल्हापूर : वाहनांना नियमबाह्य व अनियमित नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई केली. यावेळी १५० वाहनांवर कारवाई करून दहा हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.‘सरपंच’, ‘दादा’,‘मामा’, ‘आई’, ‘राम’, ‘पाटील’, ‘बॉस’,यासह अन्य फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्तपणे वाहनचालक शहरात वावरत असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या निदर्शनास आले होते.
त्यामुळे त्यांनी चार दिवसांपूर्वी सर्व नागरिक, वाहनचालकांनी वाहन चालविताना विहीत नमुन्यातील मापदंडाप्रमाणे वाहनांचे नंबरप्लेट बसवून आपले सोबत योग्य ती कागदपत्रे जवळ बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन केले होते.सोमवारी शिवाजी पूल, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका परिसरात वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत वाहतूक नियमांचा भंग करणे, नियमबाह्य नंबरप्लेट वापरणे, वाहन नोंदणी न करताच वापरणे आदींवर कारवाई करण्यात आली.