कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पर्यटक, प्रवासी, हॉटेल-लॉजमालक, हातगाडीचालकांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या सहाजणांच्या डेब्या गँगवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सादर केलेल्या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली.संशयित देवेंद्र ऊर्फ डेब्या रमेश वाघमारे (वय ३०), संजय रमेश वाघमारे (२७ दोघे, रा. रेल्वे फाटक, टेंबलाई नाका), अक्षय अशोक गिरी (२०, रा. जोशी गल्ली, विक्रमनगर), आकाश बाबासाहेब बिरंजे (२३, रा. कनाननगर), सागर कुमार पिसे (२२, रा. मंगळवार पेठ), लखन चंद्रकांत देवकुळे (२४, रा. इंद्रनगर, शिवाजी पार्क) अशी त्यांची नावे आहेत. आज, सोमवारी त्यांना पुणे ‘मोक्का’ न्यायालयात हजर केले जाणार आहे.मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संदीप रमेश बासवाणी यांचे हॉटेल सनराईज परमिट रूम व जेवण विभाग आहे. ७ सप्टेंबरला हॉटेलमालक बासवाणी हे काउंटरवर बसले असताना संशयित देवेंद्र वाघमारे याने साथीदारांसह हॉटेलमध्ये घुसून, काउंटरच्या मागील बाजूने दारूच्या दोन बाटल्या जबरदस्तीने घेऊन गल्ल्यातील रोकड काढून घेत बासवाणी यांना मारहाण केली होती.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्ह्याचा तपास स्वत:कडे घेऊन गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का १९९९ चे कलम ३ प्रमाणे कारवाई करण्यासाठी प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता.
या टोळीवर शाहूपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा या तिन्ही पोलीस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, शासकीय कामांत अडथळा, विनयभंग, चोरी, आदी २२ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरोड्याच्या गुन्ह्यात डेब्या वाघमारेसह त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्नटोळीचा म्होरक्या वाघमारे व त्याचे साथीदार शहर व जिल्ह्यातील अवैध गुन्हेगारी टोळ्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होते. या कारणावरून या टोळीचे अन्य गँगशी खटके उडत होते. यातूनच शाहूपुरी परिसरात टोळीयुद्ध होण्याची शक्यता होती.
या टोळीच्या दहशतीखाली परिसरातील सर्वसामान्य कुटुंबे, उद्योग, व्यापारी भरडले जात होते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन ही टोळी उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले. या ‘मोक्का’ कारवाईचा तपास शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे दिला आहे.व्यावसायिकांत समाधानदेवेंद्र वाघमारे व त्याचे साथीदार मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरामध्ये दादागिरी तसेच चोऱ्या, मारामाऱ्या करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी वाघमारेवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या, मारामारी, अमली पदार्थांचे सेवन, पोलीस कर्मचाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा आणणे, पत्रकारांना धमकी व धक्काबुक्की, विनयभंग अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सागर पिसेवर खून करणे, जबरी चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत; त्याचप्रमाणे इतर आरोपीही पोलिसांच्या रेकॉर्डवरील शरीराविरुद्ध व मालमत्ताविषयक, चोरीचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे व्यावसायिक त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नव्हते.
पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी कठोर भूमिका घेत संशयितांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केल्याने मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातील व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.