कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात परवानाधारक वाईन शॉप व देशी दारु दूकाने नियमबाह्य वेळेत सुरु ठेवल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी (दि. १०) अशा चार दूकानांवर कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे, याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.शिवराज पोपटराव जगदाळे (रा. राजारामपुरी दुसरी गल्ली), शिवाजी शंकर सावंत (वय ६९, रा. एस.टी.कॉलनी, कोल्हापूर), दीपराज प्रदिप माने (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) , विनायक भारत गोसावी (२६, रा. रजपूतवाडी ,ता.करवीर), महेश आनंदराव कचरे (रा. पोतनीस बोळ), विठ्ठल दगडू जाधव (२६, रा. आझाद गल्ली, कोल्हापूर), लता विलास चौगुले (रा. खंडोबा तालीम, शिवाजी पेठ), प्रकाश बाळासाहेब मगदूम (३४, रा. शिवाजी पेठ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नांवे आहेत.देशमुख म्हणाले, अंबाबाई मंदिर व मंदिर परिसरास बुधवारी पहाटे भेट दिली. त्यावेळी काही सरकारमान्य / परवानाधारक वाईन शॉप व देशी दारु दूकाने उघडलेले निदर्शनास आले. शारदीय नवरात्रौत्सव कालावधीत मोठ्या संख्येने महिलांची दर्शनासाठी याठिकाणी वर्दळ सुरु असते. त्यानूसार कारवाईचे आदेश दिले.
त्याप्रमाणे महिलेसह नऊ जणांना ताब्यात घेतले तर वाईन शॉप, देशी दारु दूकाने अशा चार दूकानांवर मुंबई पोलिस कायदा कलम ३३ डब्ल्यू १३१ प्रमाणे कारवाई केली. या दूकानाचे परवाने रद्द होण्यासाठी सबंधित विभागाला कळविले जाणार आहे.
नवरात्रौत्सव दरम्यान संबधित दारु दुकानांचे परवाने निलंबित करण्यासाठी विभागाला आदेश होण्याकामी न्यायालयात विनंती करण्यात आली आहे.दरम्यान,अवैध दारु विक्री प्रकरणी संशयित संदीप मेहबूब बागडे (वय ३१,रा. मोतीनगर, कोल्हापूर) याच्यावर दारुबंदी कायदा कलम ६५ (ख) प्रमाणे कारवाई केली.ही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सानप, सचिन पंडित यांच्या पथकाने केली.