कोल्हापूर : इचलकरंजीतील डॉक्टरकडून बाळांची विक्री करण्यात आलेले प्रकरण मागील आठवड्यात उघडकीस आले. त्यातील एका बाळ पून्हा पालकांच्या कुशीत विसावले आहे. तर दुसऱ्या बाळाची दत्तक प्रक्रिया होवून ते बाळासाठी नोंदणी केलेल्या पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्याच्या दत्तक विधानसंबंधीची कोणतिही कायदेशीर प्रक्रिया न केलेल्या पालकांचा पैसा तर गेलाच पण आता त्यांना शिक्षेचेही धनी व्हावे लागणार आहे.आठ दिवसांपूर्वी इचलकरंजी येथील डॉ. अरूण पाटील यांच्या दवाखान्यातून दोन बाळांची अवैधरित्या विक्री करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. दत्तक प्रक्रियेला होत असलेला उशीर या कारणात्सव दांपत्यांकडून हे पाऊल उचलले गेले असले तरी यातील मुंबईच्या दांपत्याला दिलेले दहा दिवसांचे बाळ आता नऊ महिन्यांचे आणि चंद्रपूरच्या दांपत्याला दिलेले चार दिवसांचे बाळ आता अडीच महिन्यांचे आहे.
या प्रकरणानंतर या दोन्ही बाळांना बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले. एक बाळ बालकल्याण संकुलात तर दुसरे बाळ डॉ. प्रमिला जरग यांच्या शिशूआधार केंद्रात आहे.
बालकल्याण संकुलकडे देण्यात आलेल्या नऊ महिन्याच्या बाळाला पालकांचा इतका लळा लागला की पालकांची ताटातूट झाल्यापासून ते पाच सहा दिवस खूप रडत होते. मुंबईच्या डॉक्टर दांपत्याने या बाळाची रजिस्ट्रारकडे नोंदणी केल्याने बालकल्याण समितीने कागदपत्रांची छाननी आणि पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेवून हे बाळ पून्हा पालकांकडे सोपवले आहे.दुसरे बाळ अडीच महिन्यांचे असल्याने अजूनही त्याला पालकांविषयीची समज नाही. हे बाळ दत्तक घेतलेल्या चंद्रपूरच्या दांपत्याने दोन लाख रुपये दिले आणि बाळ नेले. पुढे कोणतिही कायदेशीर प्रक्रिया न केल्याने त्यांना अटक झाली आहे.
अवैधरित्या केलेल्या या प्रकारामुळे पैसा जायचा तो गेलाच. बाळापासून ताटातूट झालीच पण आता तपास आणि शिक्षेची टांगती तलवारही आहे. शिवाय झालेली बदनामी आणि मनस्ताप या गोष्टी कोणत्याही परिमाणात मोजता येणार नाही.
बाळ आता दुसऱ्या दांपत्याकडेचंद्रपूरच्या दांपत्याने खरेदी केलेले हे अडीच महिन्याचे बाळ कुमारी मातेचे आहे. त्यामुळे कायदेशीररित्या हे बाळ दत्तक देण्यास ती तयार आहे का हे लिहून घेतले जाईल. त्यानंतरही विचार करण्यासाठी तिला ६० दिवसांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर हे बाळ दत्तक देण्यासाठी मुक्त झाले आहे असे पत्र शासनाला पाठवले जाते.
आॅनलाईनद्वारे दत्तक बाळासाठी अर्ज केलेले आणि वेटिंग लिस्टमध्ये असलेले कूटूंब बाळ पाहण्यासाठी पाठवले जाते अशारितीने हे बाळ आता दुसऱ्या दांपत्याला देण्यात येईल अशी माहिती डॉ. प्रमिला जरग यांनी दिली.
मुंबईच्या दांपत्याने कारा अंतर्गत बाळाची दत्तक नोंदणी केली आहे. चंद्रपूरच्या दांपत्याने पैसे देवून बाळ नेले आणि हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर मानवी तस्करी, बाल न्याय अधिनियम ८० अशी कलमं लावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना हे बाळ परत देता येणार नाही.प्रियो चोरगे, अध्यक्षा. महिला बालकल्याण समिती