कोल्हापूर - छत्रपती राजाराम हायस्कूल, कसबा बावडा येथील दहावीच्या २००० च्या बॅचचा स्नेहमेळावा कार्यक्रम झाला. तब्बल १८ वर्षांनी मार्च २००० ला दहावीच्या वर्गात शिकणारे ६० विद्यार्थी एकत्र आले. वयाने जरी वाढले असले तरी सर्वच मित्र-मैत्रिणी मनाने अगदी सोळा वर्षाचे वाटत होते. तोच उत्साह चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.कार्यक्रमप्रसंगी या वर्गाला शिकविणारे जवळपास सात शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
प्रामुख्याने डी. जी. पाटील, डी. एस. पाटील, ए. के. कांबळे, कृष्णात लाड, प्रल्हाद बेडेकर सर, कुसुम पाटील व रेखा रावराणे उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक समीरा सय्यद, ग्रामविकास अधिकारी कविता यादव, रवींद्र हराळे, मेघा पाटील या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.माजी शिक्षक डी. जी. पाटील म्हणाले की, आपण हा कार्यक्रम घेऊन एकमेकांना भेटून जुन्या आठवणी जाग्या केल्या. तसेच आपल्या शाळेसाठीही स्तुत्य उपक्रम राबवा. तसेच डी. एस. पाटील म्हणाले की, आपण सर्वजण आता समाजाला मार्गदर्शक झाला आहात. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही; परंतु आपण सर्वांनी आपले आचार व विचार पवित्र ठेवा. आरोग्य जपा. सुखी, निरोगी आरोग्यासाठी जास्तीत जास्त शाकाहारी बना.कुसुम पाटील म्हणाल्या की, आज तुमच्या वर्गातील हे मोठे अधिकारी उच्चशिक्षित विद्यार्थी बघून खूप आनंद झाला आहे. यानंतर शाळेचे पर्यवेक्षक व वर्गशिक्षक ए. के. कांबळे यांच्याकडे शाळेसाठी साहित्य प्रदान केले.दुपारच्या सत्रात सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या खूप आठवणी जागृत केल्या. त्यामध्ये मनोजा मयेकर, जयश्री पाटील, स्मिता पाटील, संजय त्रिवेदी,प्रशांत कांबळे, सागर पाटील, रमेश हालसोडे, इम्रान मुजावर, आदी माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी वर्गातील विविध शासकीय, निमशासकीय ठिकाणी उच्च पदांवर कार्यरत असणारे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माजी विद्यार्थी नितीन पाटील व विनायक चव्हाण यांनी बहारदार गीतगायन करून इतकी वर्षे त्याच्यात असणारी कला सादर केल्याने उपस्थितीत विद्यार्थ्यांनी टाळ्या व शिट्ट्यांनी दाद देत त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी सचिन पाटील, कविराज कांबळे, सुशांत कांबळे, नितीन शिंदे, शीतल पायमल, किशोर कांबळे यांनी परिश्रम घेतले. हायस्कूलचे वरिष्ठ लिपिक सुनील ठाणेकर यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले. क्षितीज येळावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, अतुल गायकवाड, जयश्री पाटील यांनी यांनी सूत्रसंचालन केले, तर हेमंत हळदकर यांनी आभार मानले.
वर्गच साकारला...कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांच्या संकल्पनेतून दहावीचा वर्ग साकारला होता. यात हॉलमध्ये ब्लॅकबोर्ड, दहावी क, वर्गशिक्षिका ए. के. कांबळे असा फलक; तर दहावीसाठी १८ वर्षांपूर्वी असणाºया अभ्यासक्रमांचे विविध विषयांचे तक्ते, कविता, शाळेची प्रार्थना; शिवाय दिवसभराच्या कार्यक्रमाचे वेळापत्रकही मोठ्या बोर्डावर लावण्यात आले होते.