कोल्हापूर : दोन दिवसाच्या विश्रांती नंतर मंगळवारी जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप राहिली असून ढगाळ वातावरणासह हवामानात गारवा जाणवत आहे.महिनाभर सुरू असलेल्या एक सारख्या पावसाने शनिवार पासून थोडी उसंत घेतली होती. रविवारी, सोमवार तर जिल्ह्यात खडखडीत ऊन पडल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.
खरीप पिकांना खतांचा डोस देण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवार सकाळ पासून वातावरणात थोडा बदल झाला असून पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. कोल्हापूर शहरात अधून मधून जोरदार सरी कोसळल्या तर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे.मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ३.०४ मिली मीटर पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असला तरी पाण्याच्या विसर्ग वाढलेला नाही. परिणाम नद्यांची पातळी कायम असून पंचगंगा १६ फुटावर आहे. जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली आहेत.
जूलैच्या सरासरीचा ९७ टक्के पाऊसजूलै महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जूलै महिन्याच्या सरासरीच्या ९७ टक्के पाऊस झाला. शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यात सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे.