कोल्हापूर : खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दहशत, लूटमारी, धमकावणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इचलकरंजीतील जर्मनी टोळीच्या विरोधात मोक्का प्रस्ताव दाखल केला आहे. या गँगमधील सात गुंडांना अटक केली असून पुणे मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोल्हापूर शहर व इचलकरंजीमधील अन्य दोन टोळ्यांचे विरोधात प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सोमवारी दिली.पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार अविनाश शेखर-जाधव ऊर्फ जर्मनी हा गेल्या दोन वर्षांपासून इचलकरंजी परिसरात गुन्हेगारी कृत्ये करत आहे. खंडणी वसूल करणे, मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण असे गंभीर गुन्हे त्याच्यासह साथीदार आकाश भिलुगडे, नईम कुकुटनूर, बजरंग फातले, प्रशांत काडवे, मनोज शिंगारे याच्यासह एका अल्पवयीन गुंडावर शिवाजीनगर, शहापूर, कुरुंदवाड आणि पेठवडगाव पोलीस ठाण्यात ३१ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हे अल्पवयीन गुंडावर दाखल आहेत.
या टोळीने दि. ४ नोव्हेंबर २०१७ च्या रात्री इचलकरंजीतील एका हॉटेलमध्ये खंडणी वसुलीसाठी तोडफोड करून हॉटेल मालकाला गंभीर जखमी केले होते. हॉटेलमालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जर्मनी गँगचा म्होरक्या अविनाश जर्मनी याच्यासह सहा जणांना अटक केली.
अल्पवयीन संशयित अद्याप पसार आहे. या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यात सुधारणा न होता उपद्रवी आणि गुन्हे करण्यामध्ये ते माहिर आहेत. त्यांना चाप लावण्यासाठी त्यांच्याविरोधात मोक्का कारवाई व्हावी, असा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सादर केला होता.
त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार या गुन्हेगारांना आता पुणे मोक्का न्यायालयात हजर करून त्यांच्या विरोधात सखोल चौकशी करून अहवाल न्यायालयात पाठविला जाणार आहे. या कारवाईमुळे इचलकरंजी परिसरातील गुन्हेगारी कृत्यांना चांगलाच आळा बसणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.या गुंडांवर झाली कारवाईजर्मनी टोळीचा म्होरक्या संशयित अविनाश शेखर-जाधव ऊर्फ जर्मनी, आकाश आण्णाप्पा भिलुगडे, नईम हसन कुकुटनूर, बजरंग अरुण फातले ऊर्फ बाचके, प्रशांत विनायक काडवे, मनोज वामन शिंगारे (सर्व रा. दत्तनगर, लिगडे मळा, कबनूर) आदींचा समावेश आहे.