कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने कोल्ड स्टोरेजसाठी भाडेतत्त्वावर १७ हजार चौरस फूट जागा देणार आहे. त्यासाठी निविदा मागवल्या असून भाड्याबरोबर स्टोरेजमधील दहा टक्के जागा समितीसाठी राखीव राहणार आहे.बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतीमाल ठेवण्यासाठी गेले अनेक वर्षे कोल्ड स्टोरेजची मागणी होत आहे. समितीच्या प्रत्येक पदाधिकारी निवडीवेळी नूतन सभापती, उपसभापती कोल्ड स्टोरेज, गूळ निर्यात झोनची आश्वासने देत राहिले; पण या कामास गती मिळाली नव्हती.
माजी सभापती सर्जेराव पाटील व विद्यमान सभापती कृष्णात पाटील यांनी हा विषय गांभीर्याने घेतला. सुरुवातीला समितीच्यावतीने कोल्ड स्टोरेज बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. एक टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज उभा करण्यासाठी १८ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे तीनशे टनासाठी किमान साडेपाच कोटी खर्च अपेक्षित होता.
एवढी मोठी गुंतवणूक करावी लागणार त्याशिवाय मंत्रालयाच्या पातळीवर मंजुरीसाठी ताकद खर्च करावी लागणार असल्याने समिती प्रशासनाने स्वत: बांधायचा निर्णय बदलला.समिती आवारातील १७ हजार चौरस फूट जागेत तीन हजार टन क्षमतेचे भाडेतत्त्वावर कोल्ड स्टोरेज बांधण्यासाठी निविदा मागवली आहे. सोमवारपासून निविदा मागवल्या असून दि. २६ डिसेंबरपर्यंत आॅनलाईन निविदा दाखल करायच्या आहेत.
या निविदा दि. २७ किंवा २८ डिसेंबरला खुल्या जाणार आहेत. सध्या समिती आवारात खासगी तीन कोल्ड स्टोरेज आहेत. तीनशे टनाचा एक तर दोनशे टनाचे दोन स्टोरेज आहेत. त्याठिकाणी व्यापारी आपला माल ठेवतात.