कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याच्या पेटीस साडेनऊ हजार रुपये दर मिळाला. शनिवारी मुहूर्तावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते आंब्याचा सौदा काढण्यात आला. यंदा ‘ओखी’ वादळाचा फटका आंबा पिकाला बसला होता; पण त्यानंतर पडलेल्या थंडीमुळे फळधारणा चांगली झाली आहे.
साधारणता आपल्याकडे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कोकणातून आंब्याची आवक सुरू होते. तत्पूर्वी जैतापूर (ता. देवगड) येथील शेतकरी एस. जी. गोवेकर यांच्या हापूस आंब्याची बाजार समितीमधील इकबाल महेबूब बागवान यांच्या अडत दुकानात आवक झाली होती. त्याचा मुहूर्तावर सौदा काढण्यात आला. पाच डझन पेटीला उच्चांकी ९५०० रुपये दर मिळाला. सलीब इब्राहीम बागवान यांनी तो खरेदी केला.यावेळी बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे, संचालक परशराम खुडे, विलास साठे, सर्जेराव पाटील, उदय पाटील, नंदकुमार वळंजू, शारदा पाटील, बाबूराव खोत, सरदार पाटील, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सालपे, राजेंद्र मंडलिक, समितीचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी उपस्थित होते.
सर्वाधिक दरआतापर्यंत मुहूर्ताच्या सौद्यात इतका दर कधीच मिळालेला नव्हता. यंदा आंब्याच्या आवकेबरोबर दरही चांगला मिळेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.