कोल्हापूर : कोरोनानंतर कोल्हापूर- तिरुपती, बंगलोर अशी विमान सेवा बंद झाली होती. आता ही सेवा पूर्ववत होत आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर ते अहमदाबाद ही इंडिगोची विमानसेवा २२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
या विमानसेवेसाठी मागील वर्षी भारतीय विमानतळ प्राधिकरणास इंडिगो कंपनीने पत्रव्यवहार केला होता. ही सेवा मागील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात सुरू होणार होती. यामध्ये कोल्हापूर- दिल्ली ही विमानसेवाही प्रस्तावित होती. मात्र, त्यात कोरोनाचा कहर वाढल्यामुळे ही विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. त्याचा पाठपुरावा कंपनीने केल्यानंतर डीजीसीएने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार अहमदाबाद-कोल्हापूर- अहमदाबाद ही विमानसेवा सुरू होत आहे. या सेवेचे आरक्षण सुरू झाले आहे. या विमानसेवेचा लाभ कोल्हापुरातील व्यापारी, उद्योजकांना होणार आहे. याबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष व वाहतूक समितीचे अध्यक्ष ललित गांधी यांनीही डीजीसीएकडे कोल्हापूर- अहमदाबाद व कोल्हापूर- दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
अशी असेल सेवा...
मंगळवारी, बुधवारी आणि शुक्रवारी या दिवशी सकाळी ८ वाजता सुटणार व १० वाजून १५ मिनिटांनी कोल्हापुरात आगमन.
कोल्हापूर विमानतळावरून सकाळी १०.४५ वाजता सुटणार व दुपारी १ वाजता अहमदाबादला पोहोचणार