लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर - अहमदाबाद या नवीन विमान वाहतूक सेवेला सोमवारपासून सुुरुवात झाली. या विमानसेवेचे पहिले प्रवासी बनण्याचा मान महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांना मिळाला. पहिल्या दिवशी ५४ जणांनी प्रवास केला. खासदार संजय मंडलिक यांनी ध्वज दाखवल्यानंतर ही सेवा सुरू झाली.
खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, विमानतळ संचालक कमल कटारिया, ‘इंडिगो’चे व्यवस्थापक विशाल भार्गव, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य अमर गांधी, विज्ञान मुंडे, विजय अग्रवाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही सेवा सुरू झाली.
पहिल्याच दिवशी या सेवेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून, पहिल्या फेरीसाठी ५४ प्रवाशांनी आपली नोंदणी केली होती. यावेळी खासदार मंडलिक यांनी पहिल्या विमान फेरीतील प्रवाशांना शुभेच्छा देत कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
--------------------------------------------
अशी असेल सेवा..
सोमवार, बुधवार व शुक्रवार ही विमानसेवा असेल.
अहमदाबादहून सुटणार : ८.३० कोल्हापुरात पोहोचणार : १०.१५
कोल्हापुरातून सुटणार : १०.४५ अहमदाबादला पोहोचणार : १२.४५.