कोल्हापूर :
व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक आणि सर्वसामान्यांकडून मागणी असलेली व पंचवीस मार्च २०२० पासून बंद असलेली कोल्हापूर -अहमदाबाद रेल्वे अखेर शनिवारपासून सुरू झाली. पहिल्या फेरीचे आरक्षण फुल्ल झाले होते.
व्यापारी, पर्यटन, व्यावसायिक, उद्योजकांसह सर्वसामान्य प्रवासी वर्गाला अत्यंत उपयोगी असलेली ही रेल्वे कोरोना महामारीमुळे २५ मार्च २०२० पासून बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्वच स्तरातून ही रेल्वे सुरू करावी म्हणून मागणी होती. त्याकरिता पॅसेंजर असोशिएशनसह समाजातील विविध संघटनांनी मध्य रेल्वेकडे पत्रव्यवहार करून ही रेल्वे सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्यास शनिवारी यश आले. तब्बल सव्वा वर्षानंतर सुरू होणाऱ्या या रेल्वे इंजिनचे पूजन रेल्वे रोड पॅसेंजर्स असोसिएशनतर्फे करण्यात आले. रेल्वे मोटारमनचेही पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शिवनाथ बियाणी, जयेश ओसवाल, रवी सरदार, संजय नाझरे, दत्ता सावंत, राजेंद्र मगदूम, स्टेशन मॅनेजर सुरेश कुमार, आरपीएफचे पार्टेसाहेब, पाटीलसाहेब आदी उपस्थित होते.
प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा सुरू झालेल्या या रेल्वेस प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला. कोल्हापुरातून शंभरजणांनी आरक्षण केले होते; तर मिरजेहून पहिल्याच फेरीसाठी ७५ टक्के आरक्षण फुल्ल झाले होते. पुन्हा ही रेल्वे सुरू झाल्यामुळे व्यापारी वर्गासह उद्योजकांकडून समाधान व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही रेल्वे आठवड्यातून कमीत-कमी दोनवेळा तरी सुरू करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
फोटो. १००७२०२१ कोल अहमदाबाद रेल्वे
ओळी : कोल्हापुरातील शाहू छत्रपती टर्मिनस रेल्वे स्थानकातून शनिवारी दुपारी प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झालेली कोल्हापूर- अहमदाबाद या रेल्वेच्या इंजिन पूजनप्रसंगी शिवनाथ बियाणी, जयेश ओसवाल, रवी सरदार, संजय नाझरे, दत्ता सावंत, राजेंद्र मगदूम, स्थानक प्रबंधक सुरेश कुमार आदी उपस्थित होते.