कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. सध्या असणारी धावपट्टी विस्तारीकरणानंतर ९३० मीटरने वाढणार आहे. नव्या धावपट्टीमुळे या विमानतळावर एटीआर आणि बोर्इंग उतरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर-तिरुपती, हैदराबाद आणि बंगलोर विमान सेवा सुरू होणार आहे.विमानतळ परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बुधवारी दुपारी धावपट्टी विस्तारीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार अमल महाडिक, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे प्रकल्प उपमहाप्रबंधक अनंत शेखर, धावपट्टीचे काम करणाऱ्या एन. एस. कन्स्ट्रक्शनचे मालक नरवीरसिंग चौहान, कोल्हापूर विमानतळ संचालक पूजा मूल, व्यवस्थापक राजेश अय्यर, सहाय्यक सरव्यवस्थापक टी. सी. कांबळे, एस. एल. साबळे, कौशिक एम., विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ, पृथ्वीराज महाडिक, विनायक रेवणकर, स्वानंद कुलकर्णी, गडमुडशिंगीचे उपसरंपच तानाजी पाटील, कणेरीचे अर्जुन इंगळे, तामगांवचे हेमंत पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर विमानतळ विकास आणि विस्तारीकरणासाठी केंद्र सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाने २८४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला. त्यातील संरक्षक भिंत आणि विद्युतीकरणाचे सुमारे २० कोटींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विस्तारीकरणाच्या दुसºया टप्प्यातील धावपट्टी विस्तारीकरणाचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले.
सध्याची १३७० मीटरची आहे. विस्तारीकरणानंतर त्यामध्ये ९३० मीटरची भर पडणार आहे. हरियाणाच्या एनएस कन्स्ट्रक्शन हे धावपट्टीचे काम करणारे असून त्यांना हे काम १८ महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे. धावपट्टी वाढल्यानंतर एटीआर, बोर्इंगसारखी मोठी विमाने याठिकाणी उतरता येणार आहेत.
विस्तारीकरणाच्या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभले. उड्डाण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर- बंगलोर ही एअर अलायन्सची विमान सेवा १५ नोव्हेंबर, तर कोल्हापूर-तिरूपती ही इंडिगो कंपनीची विमान सेवा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उड्डाण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर-गोवा विमान सेवा सुरू करण्याचा विचार केला जाईल.
विविध कामांसाठी १२४ कोटींची निविदा मंजूरविमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग, एटीसी, फायर फायटिंग इमारत, अशा विविध कामांसाठीची १२४ कोटींची निविदा मंजूर झाली असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. मुंबई, पुण्यानंतर कोल्हापूर हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे येथील विमानतळावर ‘कार्गो हब’ करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.