कोल्हापूर : येथील विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असे नामकरण लवकरच होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे नागरी उड्डयन खात्याने पाठविला आहे. त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन नामकरणाचा निर्णय होणार आहे.कोल्हापूर विमानतळ सुरू करण्यात छत्रपती राजाराम महाराज यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या विमानतळास त्यांचे नाव देण्यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, राष्ट्रीय मोडी विकास प्रबोधिनी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून गेल्या २२ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव दि. २७ मार्च २०१८ रोजी विधिमंडळात करण्यात आला. हा ठराव राज्य शासनाने नागरी विमान वाहतूक विभागाकडे पाठविला. त्यानंतर दि. २ फेब्रुवारी २०१९ रोजी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही नामकरणाची घोषणा केली. त्यानंतर नागरी उड्डयन खात्याने नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे.दरम्यान, शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबादसह अन्य १३ विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे आला आहे. या कार्यालयाकडून त्याला मान्यता मिळाल्यानंतर प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर येईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन नामकरणाचा निर्णय होईल, अशी माहिती मंत्री कराड यांनी औरंगाबाद येथे गुरुवारी दिली आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ अशा नामकरणाचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाकडे गेला आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याकडून चुकीने दुसऱ्या नावाचा उल्लेख झाला असेल. मी त्यांच्याशी बोलणार आहे. या विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण होणे योग्य आहे. -खासदार संभाजीराजे
कोल्हापूर विमानतळाची स्थापना आणि तेथून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात छत्रपती राजाराम महाराज यांचे योगदान अभूतपूर्व आहे. त्यांचे नाव या विमानतळाला द्यावे यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने १५ वर्षे पाठपुरावा केला आहे. विमानतळ प्राधिकरण, हवाई वाहतूक मंत्री, राज्य सरकार या स्तरावर प्रयत्न केले आहेत. नामकरणाबाबतचे यश शेवटच्या टप्प्यात असताना कोणीही त्याला फाटे फोडू नयेत. -ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज