कोल्हापूर : भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्यातील एकही घटक समाधानी नसल्याने रोज एकाचे मोर्चे, आंदोलने सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस विचाराचे सरकारच सामान्य माणसाला न्याय देऊ शकते, म्हणूनच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बूथ कमिटी आढावा बैठकीत ते बोलत होते. ए. वाय. पाटील म्हणाले, देशाची आजची परिस्थिती फारच भयानक असून सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीतून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखे नेतेच देशाला बाहेर काढू शकतील. त्यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथ कमिट्यांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचावे.
जिल्ह्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घोडदौड सुरू असून कोणत्याही परिस्थितीत पाच आमदार निवडून आणण्याचा निर्धार करून कामाला लागूया. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी बूथ कमिट्यांचा आढावा घेताना पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. अजित पवार यांचा वाढदिवस ए. वाय. पाटील यांच्या हस्ते केक कापुन साजरा केला.तत्पूर्वी अंधशाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, प्रा. किसन चौगुले, प्रकाश पाटील, शिवानंद माळी, बाळासाहेब देशमुख, आदींनी मनोगत व्यक्त केले. बी. एन. पाटील-मुगळीकर, पंडितराव केणे, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, विश्वनाथ कुंभार, संगीता खाडे, रोहित पाटील, उदय पाटील, शिवाजी देसाई, कल्पेश चौगुले, आदी उपस्थित होते. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी आभार मानले.बाबासाहेब बूथ कमिट्यांसाठी गडबड कराजिल्हाध्यक्ष पदासाठी बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांनी प्रयत्न सुरू केल्याची कुणकुण पक्षातील नेत्यांना लागली आहे. हाच धागा पडकत बाबासाहेबांची सगळ्या गोष्टीत गडबड सुरू आहे, त्यांनी जरा बूथ कमिट्या करण्यात थोडी गडबड दाखवावी, असा चिमटा ए. वाय. पाटील यांनी काढला.
‘ए. वाय.’ यांचे नाव जाहीर कराजिल्हाध्यक्ष पदाचे भिजत घोंगडे ठेवल्याने संभ्रमावस्था आहे. कोणामुळे तटले आहे, प्रदेशाध्यक्षांनी ए. वाय. पाटील यांच्या नावाची घोषणा करावी, अशी मागणी जयकुमार शिंदे यांनी केली.
कुरुंदवाडच्या ‘त्या’ दोघांवर कारवाई कराकागल मतदारसंघात विरोधक एकवटले आहेत, त्यांचे काय येणार नाही हे नक्की आहे; पण आपल्या पक्षातील कुरुंदवाडचे दोघेजण कागलमध्ये बसून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार की नाही, अशी विचारणा जयकुमार शिंदे यांनी केली.