कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील (टी. पी.) अनेक फाईल्स या तत्कालीन सहायक संचालक धनंजय खोत यांच्या घरात असल्याचा नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलेला आरोप चुकीचा ठरला. या कार्यालयातील ४९७ फाईल्सची तपासणी केली असता सर्व फाईल्स या कार्यालयातच असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले.नगरसेवक भूपाल शेटे यांनी गेल्या तीन वर्षांत बोगस टीडीआर, पर्चेस नोटीसद्वारे आरक्षण उठवण्याचे प्रकार उघडकीस आणले आहेत. यातील काही प्रकरणे तत्कालीन सहायक संचालक मारुतराव राठोड, धनंजय खोत यांच्या काळात उघडकीस आली. त्यानंतर ती रोखण्यातही आली.
दोन दिवसांपूर्वीच शेटे यांनी नगररचना विभागाच्या अनेक फाईल्स धनंजय खोत यांच्याकडेच असल्याचा आरोप केला होता. त्याची दखल घेत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांना चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार चल्लावाड यांनी बुधवारी आवक-जावक रजिस्टरनुसार सर्वच्या सर्व म्हणजे ४९७ फाईल्स तपासल्या.
शुक्रवारी यातील २९७ फाईल्स पुन्हा तपासण्यात आल्या आहेत. अनेक फाईल्स या कार्यालयातच होत्या, तर काही फाईल्स या संबंधित अभियंता, इस्टेट विभागाकडे पाठविण्यात आल्या होत्या. या सर्व फाईल्स मागवून तपासणी करण्यात आली. एकही फाईल कोणाच्या घरात नसल्याचे स्पष्ट झाले. तसा अहवाल चल्लावाड यांनी आयुक्तांना दिला.दरम्यान, जर फाईल मंजूर करून आपल्याच कार्यालयात धनंजय खोत यांनी ठेवल्या असतील तर त्या संबंधितांना का दिल्या नाहीत, असा सवाल भूपाल शेटे यांनी उपस्थित केला आहे. यासंबंधाची कागदपत्रांची त्यांनी मागणी केली आहे.