समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: विमानतळाचा विकास आणि जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू असलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गांमुळे कोल्हापूरच्या चौफेर प्रगतीला वेग येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनी शाहु स्टेडियमवर ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम आणि संचलनाने या सोहळ्याची रंगत वाढवली.
यावेळी शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी वसंतराव माने या स्वातंत्र्यसैनिकांसह बारा स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवा पत्नींचा मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राष्ट्रपतींचे शौर्यपदक प्राप्त उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, सर्वात लहान गिर्यारोहक अन्वी चेतन घाटगे यांच्यासह विविध क्षेत्रात उत्तम काम करणारे विद्यार्थी, कामगार, सैनिक यांचा गौरव करण्यात आला. मुश्रीफ यांनी संचलन करून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संविधान उद्दिशिकेचे वाचन केल्यानंतर तंबाखुमुक्तीची आणि स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथही यावेळी घेण्यात आली. राष्ट्रभक्तीभर गीतांनी यावेळी वातावरण भारले होते.