कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या गेली तीन वर्षे रेंगाळलेल्या बांधकामाला ‘पुरातत्त्व’ विभागाने सोमवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे या बांधकामाचे काम तत्काळ सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सोमवारी दिल्लीत भारतीय पुरातत्व विभागाच्या बैठकीत ही मंजरी देण्यात आली. प्राचीन ब्रम्हपुरी टेकडीच्या कक्षेत पर्यायी शिवाजी पूलाचे बांधकाम येत असल्याच्या अडचणीमुळे या पुलाचे बांधकाम डिसेंबर २०१५ पासून अर्धवट स्थितीत रेंगाळले होते. पण टेकडीपासून पूलाचे अंतर १२७ किमी असल्यावर ‘पुरातत्व’च्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे या पूलाच्या उर्वरित बांधकामाचा मार्ग मोकळा झाला.ब्रिटीशकालीन शिवाजी पूलाचे आयुर्मान संपल्यामुळे त्याच शेजारी नवीन पर्यायी पूल उभा करण्यात आला आहे. पण या पर्यायी पूलाचे बांंधकाम सुमारे ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर ‘पुरातत्व’ कायद्याच्या अडचणीत पूलाचे बांधकाम रेंगाळले. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक, खासदाार संभाजीराजे तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूलाला मंजूरीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी लोकसभेत पुरातत्व कायद्यात बदलाबाबत विधेयक मंजूर झाले पण राज्यसभेत हे विधेयक आडकल्याने पुन्हा या पुलाचे भवितव्य अडचणीत आले होते.
पूलाच्या कामाबाबत कोल्हापूरात सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने आंदोलने केली. त्या आंदोलकांना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी आश्वासनावर रोखले.
त्यानंतर प्रशासकिय पातळीवर पाठपुरावा केल्यानंतर दि. २८ व २९ मे रोजी राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरात येऊन प्राचीन ब्रम्हपुरी टेकडीचे सर्व्हेक्षण केले. त्यानंतर टेकडीचे पूलापासूनचे अंतर मोजमाप करुन त्याचा संयुक्त अहवाल करुन तो दिल्लीच्या भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठविण्यात आला.
त्या अहवालामध्ये प्राचीन ब्रम्हपुरी टेकडीपासून पर्यायी शिवाजी पूलाचे अंतर हे १०० मीटर कक्षेबाहेर म्हणजेच १२७ मीटर असल्याचे स्पष्ट केले होते. त्या अंतराच्या निर्णयावर सोमवारी दिल्लीतील भारतीय पुरातत्व विभागाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.या निर्णयामुळे शिवाजी पूलाच्या बांधकामाचा मार्ग मोकाळा झाला आहे.