कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारपासून मंडप उभारणीला सुरुवात झाली, तर दीपमाळा, सज्जा याची पाण्याने स्वच्छता करण्यात आली. याचबरोबर शिखराची रंगरंगोटी करण्यात आली आहे.
१० आॅक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे; त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसह जिल्हा प्रशासनाने नियोजनासाठी बैठका सुरूकेल्या आहेत. रविवार (दि. ३०) पासून अंबाबाई मंदिर शिखराची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. याचे काम मुंबईच्या एस. एम. एस. या प्रा. लि. संस्थेला देण्यात आले आहे. गेली १५ वर्षे ही संस्था सेवाभावी वृत्तीने अंबाबाई मंदिराची स्वच्छता करते.
सोमवारी दीपमाळा व सज्जाची साफसफाई करण्यात आली. यासाठी १४ स्वयंसेवक कार्यरत आहेत. रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत स्वच्छता करण्यात येते. गुरुवारी (दि. ४) गाभारा आणि कासव चौक स्वच्छता करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवापर्यंत ही स्वच्छता करण्यात येणार असल्याचे कंपनीचे प्रमुख संजय माने व किशोर मेस्त्री यांनी सांगितले.