कोल्हापूर : भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने करुन या घटनेचा निषेध करत आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांतर्फे बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
शहरातील बिंदू चौक येथे रास्ता रोको करुन टायर पेटवून सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. तसेच या घटनेस जबाबदार असणाऱ्या संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांकडून काही दुचाकींची तोडफोड करण्यात आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.भीमा-कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या घटनेची प्रतिक्रीया मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातही उमटली. दिवसभरात बिंदू चौक, ताराराणी चौक, आंबेवाडी, शिरोली, वसगडे, केर्ले येथे रास्ता रोको करुन या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. त्याचबरोबर दसरा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.दरम्यान टाऊन हॉल उद्यान येथे झालेल्या बैठकीत या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये ताकदीने उतरुन तो यशस्वी करुया असा निर्धार यावेळी नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.