कोल्हापूर : शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना राज्य सरकारने मंजूर केलेली १०७ कोटींची ‘अमृत योजना’ शासकीय अधिकाऱ्यांनी टक्केवारीत अडकविली असल्याचा गंभीर आरोप भूपाल शेटे यांनी सोमवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. त्यामुळे सभागृहात सत्तारूढ आणि विरोधी सदस्य एकमेकांना भिडले. मात्र माजी महापौर हसिना फरास यांनी त्यात हस्तक्षेप करीत सर्वांना शांत राहण्याचा सल्ला दिल्याने सभागृहात शांतता निर्माण झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.
मंत्र्यांचा उल्लेख करताच भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर यांनी शेटे यांच्या वक्तव्यावर जोरदार हरकत घेत ‘शेटे यांनी शब्द मागे घ्यावेत,’ अशी मागणी लावून धरली. यावेळी शेटे-सूर्यवंशी यांच्यात खडाजंगी झाली. सुनील कदम यांनीही शेटे यांच्या वक्तव्यावर हरकत घेत जनतेला भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर आरोप-प्रत्यारोप करू नयेत, असा सल्ला दिला.विरोधी आघाडीचे राजसिंह शेळके, किरण नकाते, कमलाकर भोपळे यांनी शेटे यांना जोरदारपणे विरोध केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. शेवटी सभागृहातील ज्येष्ठ सदस्या हसिना फरास यांनी शेटे यांना समजावत ‘तुम्ही आरोप करणार असाल, भांडत बसणार असाल तर प्रशासनाला तेवढेच पाहिजे आहे. आपल्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न करू नका,’ असे आवाहन केले; त्यामुळे सभागृहातील गोंधळ शांत झाला.तत्पूर्वी शहरातील विस्कळित पाणीपुरवठ्यावर सभेत वादळी चर्चा झाली. २ मे रोजी पाणीप्रश्नावर सभा तहकूब करण्यात आली. त्याच्या आधी एक महिन्यापूर्वी झालेल्या सभेत याच विषयावर चर्चा झाली. प्रशासनाने एक महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र काहीच केले नसल्यामुळे सदस्यांनी या सभेत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना चांगलेच फैलावर घेतले.
एवढेच नाही, तर ‘शहरातील नागरिकांना नीट पाणी देता येणार नसेल तर घरी जा,’ असा सल्लाही सदस्यांनी दिला. विजय सूर्यवंशी, उमा इंगळे, उमा बनछोडे, राहुल चव्हाण, राजाराम गायकवाड, स्मिता माने, अशोक जाधव, शोभा कवाळे, जयश्री चव्हाण, सूरमंजिरी लाटकर, जयंत पाटील, रूपाराणी निकम यांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या.