कोल्हापूर : जिल्ह्यात मटका, जुगार, चोरटी दारू बंद करण्यामध्ये असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते या दोघांना बुधवारी ‘शो कॉज’ नोटीस पाठविण्यात आली.
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना पत्र पाठवून आठ दिवसांत मटका कारवाईचा खुलासा सादर करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.जनतेत विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे नाचक्की होऊ लागली आहे. पोलिसांची प्रतिमा सुधारावी यासाठी परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील मटका, जुगार, दारू असे अवैध धंदे व छुपी ‘हप्ता सिस्टीम’ बंद करण्याचे लेखी आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांसह उपअधीक्षक, निरीक्षकांना दिले होते; परंतु हा आदेश फक्त कागदावरच राहिला आहे.
शिवाजी पेठेतील राऊत गल्लीतील मटका बुकीवर मंगळवारी रात्री विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडील वाचक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी छापा टाकून बुकीचालक विजय पाटील याच्यासह तेराजणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ६ लाख ४८ हजारांची रोकड व मटक्याच्या चिठ्ठ्या भरलेली पोती, लॅपटॉप, मोबाईल हॅँडसेट असा सुमारे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यापूर्वी ५ फेब्रुवारी २०१७ रोजी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी रंकाळा बसस्थानकाच्या पिछाडीस केदार प्लाझामध्ये माजी नगरसेवकाच्या मटका बुकीवर छापा टाकून विजय पाटील, अजित बागलसह २१ जणांना अटक केली होती.तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांना ‘शो कॉज’ नोटीस पाठविली होती. कारवाई होऊन आठ दिवस उलटले की पुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका सुरू होतो, हे मंगळवार (दि. २७) च्या कारवाईवरून स्पष्ट झाले. शिवाजी पेठेतील मटक्याच्या कारवाईचा अहवाल बुधवारी पोलीस उपअधीक्षक राणे यांनी सादर केला. त्यानुसार गुजर व मोहिते यांना ‘शो कॉज’ नोटीस पाठविली आहे.पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या आशीर्वादाने पुन्हा मटका फोफावू लागला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्ररीत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कार्यरत आहे. या ठिकाणी पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पाच उपनिरीक्षकांसह वीस ते पंचवीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे यांना शहराचा कानाकोपरा माहीत आहे. कुठे काय चालते याची माहिती असताना हा विभाग कारवाई का करीत नाही? अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत का? यासंबंधी चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, या आशयाचे पत्र नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
सिस्टीमला चाप लावण्यासाठी विशेष पथकेखाकी वर्दीला खुश ठेवून अवैध व्यवसायांचे जाळे पसरविणारे पंटर उजळ माथ्याने फिरताना दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिकांशी मैत्रीचे नाते न जोडता गुन्हेगारांशी पोलिसांची सलगी वाढली आहे. पैशांच्या भुकेने पछाडलेला काही कर्मचारी वर्ग आजही पोलीस दलात कार्यरत आहे. ‘रक्षकच भक्षक’ होऊ लागल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उतरलेला आहे. या सर्व सिस्टीमला चाप लावण्यासाठी विशेष पथकांना परिक्षेत्रातील १४६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकण्याचे आदेश नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचा बीमोड करण्याचे आदेश देऊनही काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.विश्वास नांगरे-पाटील,विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र.