कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना बॅँकांच्याऐवजी विकास संस्थांच्या माध्यमातून राबवाव्यात, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
महामंडळाच्या वतीने १२ टक्के व्याज परताव्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. ग्रामीण भागात जास्तीत जास्त तरुण शेतीवर अवलंबून असतात. शेती, दूध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय, मळणी मशीन, आदी व्यवसायांसाठी कर्जाची गरज असते. यामध्ये बॅँका तारण घेतल्याशिवाय कर्ज देत नाहीत. जिल्हा बॅँक विकास संस्थांच्या माध्यमातून कर्जपुरवठा करते. जमीन तारण देऊन बॅँकांना कर्ज देणे कठीण आहे; पण विकास संस्था ई कराराने जमिनीवर बोजा नोंद करून मग जिल्हा बॅँक कर्ज देते; त्यामुळे वसुली सुरळीत होण्यास मदत होते; त्यामुळे महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी विकास संस्थांच्या माध्यमातून करावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, भैया माने, आदी उपस्थित होते.अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना विकास संस्थांच्या माध्यमातून राबवाव्यात, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले. यावेळी के. पी. पाटील, भैया माने, आदी उपस्थित होते.