कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत चलनटंचाई भासत आहे. करन्सी चेस्ट बॅँकांकडून पुरेशा प्रमाणात चलन पुरवठा होत नसल्याने आर्थिक टंचाई झाली असून, त्यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांची मात्र ससेहोलपट सुरू आहे.साखर कारखान्यांचा हंगाम संपून महिना उलटल्याने कारखान्यांकडून उसाची बिले अदा करण्याचे काम सुरू आहे. त्यात साखर आयुक्तांनी तगादा लावल्याने कारखाने खडबडून जागे झाले असून, त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने पैशांची गरज आहे.
खरीप हंगामाची तयारी व उसाला खतांची गरज आहे; पण बॅँकांमधून पैसे मिळत नाहीत. जिल्हा बॅँकेच्या शाखांमधून पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कमच मिळत नाही. ऐन लग्नसराईत चलनटंचाईचे संकट पुन्हा आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ‘आमच्या खात्यावरील पैसे का देत नाही?’ असा जाब ग्राहक विचारत असल्याने कर्मचारी व ग्राहकांमध्ये खडाजंगीचे प्रसंग उद्भवत आहेत.
जिल्हा बॅँकेला साखर कारखान्यांच्या हंगामात १८ ते १९ कोटींची गरज असते. इतर वेळी सरासरी १५ कोटी रोज लागतात. त्यानुसार बॅँक करन्सी चेस्ट बॅँकांकडे मागणी केली जाते; पण गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्हा बॅँकेशी संलग्न ‘रत्नाकर बॅँक’, ‘आयसीआयसीआय बॅँक’, ‘स्टेट बॅँक’, ‘बॅँक आॅफ इंडिया’ या करन्सी चेस्ट बॅँकांकडून अपेक्षित चलनपुरवठा होत नाही. त्यामुळे शाखांमध्ये पैशाचा ठणठणाट दिसत आहे.नोटाबंदीच्या कालावधीची आठवणनोटाबंदीच्या दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीत पुरेसा चलनपुरवठा होत नव्हता. त्यामुळे सर्वच आर्थिक यंत्रणा ठप्प झाली होती. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुन्हा नोटाबंदीची आठवण नागरिकांना येऊ लागली आहे.
दहा, वीसच्या नोटांचा भरणाजिल्हा बॅँकेला करन्सी चेस्ट बॅँकांकडून मागणीच्या ३० टक्केच चलन पुरवठा होतो. तोही दहा व वीस रुपयांच्या नोटा असल्याने त्याचे वितरण करण्याची डोकेदुखी होत आहे.
करन्सी चेस्ट बॅँकांकडून अपेक्षित चलन पुरवठा होत नसल्याने आम्ही शाखांना मागणीप्रमाणे पैसे देऊ शकत नाही. ऐन लग्नसराईत ग्राहकांची गैरसोय होते याची कल्पना असल्याने जास्तीत जास्त चलन पुरवठ्यासाठी प्रयत्नशील आहोत.-डी. एस. कालेकर,व्यवस्थापक, अकौंट्स-बॅँकिंग