कोल्हापूर : महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी करुन पक्षाचा आदेश डावलून भाजपच्या उमेदवारास मतदान केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ज्येष्ठ नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष सोडण्याचा इशारा दिला.
माझे मार्गदर्शक तसेच राष्ट्रवादीचे निष्ठावंत व प्रामाणिक नेते प्रा. जयंत पाटील यांना जर पक्षात मानसन्मान मिळत नसेल तर अशा पक्षात राहणे मला योग्य वाटत नाही व त्या पक्षात राहण्याची इच्छा नाही, अशा शब्दात आपली भावना व्यक्त करत पक्षातील बेबंदशाहीला तोंड फोडले.स्थायी समिती सभापती निवडणुकीत निर्माण झालेला गोंधळ आणि राष्ट्रवादीतील कलुषित वातावरण शांत होतोय असे वाटत असतानाच शनिवारी प्रा. जयंत पाटील यांचे समर्थक नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी पक्ष नेतृत्वावर आक्षेप नोंदवित आपल्या मनातील खदखद पत्रकारांसमोर व्यक्त केली.
ते म्हणाले की, ‘स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने पराभवास सामोरे जावे लागले. या बंडखोरीला पक्षाचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांचा काहीही संबंध नसताना त्यांनीच फूस लावल्याचा संशय निर्माण झाला आहे.पक्षानेही त्यांच्यावर अविश्वास दाखविला आहे. प्रा. पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत जीवाचे रान करुन नेत्यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करुन पक्षास विजय मिळवून दिला. महानगरपालिकेवर पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी जयंत पाटील यांची धडपड, त्यांचे नियोजन, चाणाक्ष युक्त्या, व पक्षाबद्दलची निष्ठा या सर्व गोष्टी मी जवळून पाहिलेल्या असून त्याचा मी एक साक्षीदार आहे.
स्थायी सभापती निवडणुकीत झालेल्या फु टाफुटीत त्यांचा काडीमात्र संबंध नसताना त्यांच्यावर होणारे आरोप, पक्षाकडून दाखविला जाणारा अविश्वास माझ्या जिव्हारी लागला आहे. प्रा. पाटील हे माझे मार्गदर्शक असून ते मला भगवान समान आहेत. त्यांच्यासारख्या निष्ठावान व प्रामाणिक नेत्याला जर पक्ष मानसन्मान मिळत नसेल तर अशा पक्षात राहणे मला योग्य वाटत नाही. त्या पक्षात राहण्याची माझी इच्छा नाही.’प्रा. पाटील यांच्यावर कोणी आरोप केले आहेत का ? अशी विचारणा करता जाधव यांनी वर्तमानपत्रात ज्या बातम्या येत आहेत, त्यावरुन पक्षात, नगरसेवकामध्ये असंतोषाचे तसेच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्ष नेत्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पक्षांतर्गत धुसफुस थांबवावी. सर्व नगरसेवकांना एकत्र आणून आघाडी मजबत करावी, अन्यथा कोणत्याही क्षणी आपण पक्ष सोडू. त्यासाठी नगरसेवक पदावर जर गंडांतर आले तरी मी मागे हटणार नाही.नेत्यांसमोर तुमची ही व्यथा मांडली काय असे विचारले असता जाधव यांनी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजेश लाटकर, ज्येष्ठ नेते आर.के.पोवार यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे. प्रा. जयंत पाटील यांनीही आमचे नेते हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन खुलासा केला आहे. सर्वांना सोबत घेऊन एकत्रीत चर्चा करुन झालेले गैरसमज तातडीने दूर व्हावेत.
नेत्यांना नाराजीची कल्पना होतीसभापती निवडणुकीत मेघा पाटील यांचे नाव आल्यास नगसेवकांत नाराजी होऊ शकते असे प्रा. जयंत पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना सांगितले होते. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी व भरल्यानंतर अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांची भेट घालून दिली होती. पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचे त्यांनी मुश्रीफ यांना स्पष्टपणे सांगितले होते, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर ?राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांनी यापूर्वीच बोलून दाखविली आहे. आता मुरलीधर जाधव यांनी त्याला तोंड फोडले.
प्रा. जयंत पाटील यांनी जर पक्षातून बाहेर पडायचेच ठरविले तर त्यांच्या सोबत कोणकोण जाऊ शकते याचे संभाव्य गणित राष्ट्रवादीत मांडले जात आहे. पिरजादे, चव्हाण व जाधव यांच्यासह उपमहापौर सुनिल पाटील, अनुराधा खेडकर, सचिन पाटील असे सहा नगरसेवक बाहेर पडू शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.