कोल्हापूर : शिवाजी पेठेतील राहत्या घरी मुंग्या जाळण्यासाठी रॉकेल ओतून कागद पेटवताना रॉकेलच्या कॅनचा भडका उडून गंभीररित्या भाजून जखमी झालेल्या शाळकरी मुलाचा सीपीआर रुग्णालयात शुक्रवारी उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. अनिरुद्ध अमित पाटील (वय १३) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, शिवाजी पेठेत राहणारे रिक्षाचालक अमित पाटील याचा अनिरुद्ध हा एकुलता मुलगा होता. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये तो सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. ९ मार्चला पाटील हे रिक्षा घेऊन बाहेर गेले. पत्नी खासगी नोकरीवर गेल्या. घरात अनिरुद्ध एकटाच होता.
घरातील कोपऱ्यात मुंग्या आल्याने त्या जाळण्यासाठी कागदावर रॉकेल ओतून तो कागद पेटविला. यावेळी कॅनमधील रॉकेलला आग लागून भडका उडाला. त्यामध्ये अनिरुद्ध भाजून गंभीर जखमी झाला. त्याचा आरडाओरड ऐकून शेजारील लोकांनी धाव घेत आग विझवली. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
गेली एकवीस दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. शुक्रवारी सकाळी त्याचा श्वास बंद पडला. एकुलत्या मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे शिवाजी पेठेत हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.