महापुरात करंजफेन बाजारपेठ उद्ध्वस्त, भूस्खलन झाल्याने कोल्हापूर अणुस्कुरा मार्ग बंद
कासारी नदीच्या महापुराचे पाणी करंजफेन (ता. शाहूवाडी) बाजारपेठेत शिरल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सुमारे ४५ गावांची गरज भागवणारी ही बाजारपेठ पाणी शिरल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. करंजफेन गौळवडा दरम्यान पूर्ण डोंगर रस्त्यावर कोसळल्याने अणुस्कुरा मार्ग बंद झाला आहे.
२२ जुलैला कासारी नदीला आलेल्या प्रलयकारी महापुराचे पाणी दोन दिवस करंजफेन बाजारपेठेतून वाहत होते.त्यामुळे व्यापाऱ्यांचे सर्व आर्थिक गणित शून्य झाले आहे. अगदी लहान सुईपासून ते संपूर्ण घरबांधणी साहित्यपर्यंत सर्व गरजा करंजफेन बाजारपेठेत पूर्ण होतात. परंतु मध्यरात्री कासारी नदीचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने बाजारपेठच गडप झाली होती. पाणी दुकानांमध्ये पंधरा फुटांपर्यंत तुंबून राहिल्याने व्यापाऱ्यांना कोणताही माल उचलता आला नाही. लहान-मोठ्या सर्व व्यापाऱ्यांचे मिळून साधारणपणे तीन कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. बाजारपेठेतील महा इ-सेवा केंद्रातील झेरॉक्स मशीन्स, संगणक,मोबाइल शॉपी,इत्यादी सर्व साहित्य भिजून निरूपयोगी ठरले आहे. कृषी केंद्रातील कीटकनाशके,औषधे,खते नष्ट होऊन उग्र वास सुटला आहे. कापड दुकाने,स्टेशनरी,चपला इ भिजून खराब झाली आहेत. किराणा दुकानातील साखर, मीठ यांची शेकडो पोती पाण्यात विरघळून नष्ट झाली आहेत. कडधान्य,कांदे,बटाटे इ भिजल्याने फेकून द्यावे लागले आहेत. दुर्गम,डोंगरी भागातील शेतकऱ्यांच्या गरजा भागवणारी ही बाजारपेठ तब्बल दहा वर्षे पाठीमागे गेली आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाला वेगळा निधी उपलब्ध करून आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी व्यापारीवर्गातून होत आहे. दरम्यान शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार डॉ विनय कोरे, जिल्हा बँक संचालक सर्जेराव पाटील पेरिडकर, पं.स. सदस्य पांडुरंग पाटील, उप विभागीय अधिकारी अमित माळी यांनी बाजारपेठेस भेट देऊन लोकांना धीर दिला.
१५ दिवसांपूर्वी सुरू झालेला पेट्रोल पंप जमीनदोस्त:- ग्रामीण भागातील लोकांची गरज ओळखून नामदेव पोवार या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने पेट्रोल पंप सुरू केला होता, परंतु २२ जुलै रोजी रात्री पंपावर पूर्ण डोंगराचे भूस्खलन झाल्याने हा पंप जमिनीत गाडला गेला आहे, पंपाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
‘या वर्षीचा महापूर अतिशय भयानक होता, बाजारपेठेत अतिशय वेगाने पाणी शिरून पाणी पातळी वाढल्याने लोक गोंधळून गेले, बाजारपेठेत पंधरा लोक अडकले होते हे समजताच,शाहूवाडी तालुका आपत्ती व्यवस्थापन पथक घेऊन आम्ही स्वतः पोहचलो आणि चार तासात या लोकांची सुटका केली, या परिसरातील शेती व बाजारपेठेतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.’
गुरू बिराजदार
तहसीलदार,
शाहूवाडी
फोटो:-1)पूरग्रस्त करंजफेन बाजरपेठेला आमदार
डॉ विनय कोरे यांनी भेट देऊन पाहणी केली
फोटो 2) करंजफेन जवळ डोंगर खचल्याने कोल्हापूर मार्ग बंद आहे.