कोल्हापूर : केवळ १५ टक्के कामासाठी रखडलेल्या आजरा तालुक्यातील उत्तूर परिसरातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या २२७ कोटी ५४ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढीसाठी महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प आजरा तालुक्यातील आर्दाळ, पेंढारवाडी, करपेवाडी या गावांजवळ आंबेओहोळ नाल्यावर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्यात येत आहेत.
या माध्यमातून आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांतील ३९२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या मातीच्या धरणाचे ८० टक्के, पुच्छ कालव्याचे ८० टक्के काम; तर विद्युत विमोचकाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे; परंतु अद्याप प्रकल्पाची घळभरणी झालेली नाही.या प्रकल्पासाठी मूळ प्रशासकीय मान्यता आॅक्टोबर १९९८ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता जानेवारी २०१० मध्ये घेण्यात आली. प्रकल्पाची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने व्यय अग्रक्रम समितीसमोर सादर केला होता. कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निविदा प्रक्रिया सुरू असलेली कामे पूर्ण करण्यात येणार असल्याने पुढील वर्षी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत आग्रह धरला जाणार आहे.
जमिनीसाठीच्या रकमेचा प्रस्तावामध्ये समावेशया प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना ज्या जमिनी द्यावयाच्या आहेत, त्यांना पाहिजे असल्यास रोख रक्कमही दिली जाणार आहे. त्याचीही तरतूद या सुधारित प्रशासकीय मंजुरीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे जमीनवाटपाचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता आहे.
अन्य प्रकल्पांचे काय?या प्रकल्पाबरोबरच आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्प केवळ ४० कोटी रुपयांसाठी रखडला आहे. तसेच याच तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील सर्फनाला प्रकल्पाचेही काम रखडले आहे. राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाचे कामही सुरू झालेले नाही. या प्रकल्पांबाबतही आता युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.