कोल्हापूर : केवळ ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या पायाभूत रिक्त पदावर नियुक्त शिक्षकांच्या मान्यता देण्यात यावी . या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात शुक्रवारी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन तासाहून अधिक काळ सुरु असलेले आंदोलन अखेर उपसंचालक किरण लोहार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
रिक्त पदावर नियुक्त शिक्षकांना मान्यता द्यावी. या मागणीसाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन संघाने शुक्रवारी दुपारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. (छाया : दीपक जाधव)
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावी बोर्ड परिक्षा २०१८ परिक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन यशस्वी केले.
या आंदोलनाची फलनिष्पती म्हणून शासनाने १३ मार्च २०१८ ला शासन आदेश काढून मे २०१२ नंतर पायाभूत रिक्त पदावर भरती केलेल्या केवळ नाहरकत प्रमाणपत्र नसलेल्या २७६ नियुक्त शिक्षकांना मान्यता देण्यासाठी शासनादेश पारीत करण्यात आला.
या २७६ पैकी ७० शिक्षक कोल्हापूरातील आहेत. त्या ७० जणांना मान्यता देण्यासाठी ७ मे २०१८ ला विशेष शिबीरही घेण्यात आले. परंतु अद्यापही त्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता प्रती मिळाल्या नाहीत.या मान्यतेच्या प्रती शिक्षण उपसंचालकांनी त्वरीत द्याव्यात. यासह २००३ ते २०१८ पर्यंतची वाढीव रिक्त पदांची माहीतीही शासनाने तात्काळ सादर करावी. या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजता प्रथम कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यानंतर उपसंचालक लोहार यांच्या दालनात जावून दोन तासाहून अधिक काळ शिक्षकांनी ठिय्या मारला.
अखेर पाच वाजण्याच्या सुमारास उपसंचालक लोहार यांनी मी नव्याने कार्यभार घेतला आहे. येत्या ८ दिवसांत आपल्या प्रस्तावाची पाहणी करुन त्यांची निर्गत करुन हा प्रश्न मार्गी लावू . असे आश्वासन उपसंचालक लोहार यांनी दिले. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रा. सुरेश देसाई, प्रा. अविनाश तळेकर, प्रा. बी.बी.पाटील, प्रा. एस.आर.भिसे, प्रा. डी.डी.शितोळे, प्रा.ए.डी.चौगुले, प्रा.के. जी.जाधवर, प्रा. सी.व्ही.जाधव, प्रा. आर.पी.टोपले, प्रा.एम.के.परिट, प्रा.व्ही.एस.मेटकरी, प्रा. शिवाजी होडगे, प्रा.टी.के.सरगर, प्रा. एस.आय.मोरे, प्रा.एस.आर.पाटील, प्रा.अमरसिंह शेळके आदी उपस्थित होते.