कोल्हापूर : चातुर्मासानिमित्त बुधवारी श्री १००८ भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर, शाहूपुरी व समस्त दिगंबर जैन समाज, कोल्हापूर यांच्या वतीने आचार्य १0८ श्री पद्मनंदी महाराज यांचे ससंघ जल्लोषात आगमन करण्यात आले. यानिमित्त घोडे, उंट, रथ, महिलांचे झांजपथक, पारंपरिक बँडपथक आणि श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.चातुर्मासासाठी परमपूज्य आचार्य १0८ श्री पद्मनंदी महाराज यांच्यासोबत परमपूज्य १0५ आर्यिका पवित्रश्री माताजी, परमपूज्य १0५ आर्यिका विजय श्रीमाताजी, परमपूज्य १0५ आर्यिका धैर्यश्री माताजी, परमपूज्य १0५ आर्यिका व्याख्याश्री माताजी, परमपूज्य १0५ आर्यिका वार्तीकाश्री माताजी व परमपूज्य क्षुल्लिका कुंदनश्री यांचे कोल्हापुरात आगमन झाले.
एस.टी. स्टॅँडजवळील वटेश्वर महादेव मंदिराजवळ त्यांचे जैन समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी लक्ष्मीसेन जैन मठाचे परमपूज्य डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी उपस्थित होते. यानंतर जैन धर्माचा ध्वज, घोडे, उंट, पारंपरिक बॅँडपथकाद्वारे वाजणारे भक्तिसंगीत, रथ; पिवळ्या व भगव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या श्राविका तसेच भक्तिरसात तल्लीन श्रावक अशा लवाजम्यानिशी मिरवणुकीला प्रारंभ झाला.
पहिल्यांदाच मिरवणुकीत महिला झांजपथकाचा समावेश होता. मिरवणूक राजीव गांधी पुतळा, मुख्य रस्त्याने दाभोळकर कॉर्नर, शाहूपुरी पोलीस ठाणे, गोकुळ हॉटेलपासून डावीकडे वळून शाहूपुरी येथील मंदिरात विसर्जित झाली. मार्गावर ठिकठिकाणी जैन बांधवांच्या वतीने महाराजांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मंदिराचे अध्यक्ष प्रफुल्ल चमकले, विश्वस्त महावीर देसाई, सुभाष चौगुले, उपाध्यक्ष धनंजय दिगे, सचिव संजय शेटे, सहसचिव सुरेश रोटे यांच्यासह सर्व जैन मंदिरांचे अध्यक्ष व विश्वस्त उपस्थित होते. चातुर्मास कलश स्थापना २४ तारखेला होणार असून, त्याची समाप्ती ७ नोव्हेंबर रोजी होईल.
या कालावधीत शाहूपुरी मंदिरामध्ये रोजचा आहार, त्यानंतर दुपारी तीन वाजता प्रवचन, दर रविवारी विशेष प्रवचन,तसेच मान्यवरांची विशेष व्याख्याने, पूजाअर्चा, आरती, विधीविधाने, अनेक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. परगावांहून येणाऱ्या सर्व श्रावक-श्राविका यांच्या भोजनाची व व्हासाची सोय चातुर्मास समितीमार्फत करण्यात येणार आहे. तरी या चातुर्मासातील सर्व कार्यक्रमांचा श्रावक-श्राविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चातुर्मास समितीमार्फत करण्यात आले आहे.