कोल्हापूर : बेळगाव येथील चित्रकार अब्दुल बिजापुरे यांच्या चित्रप्रदर्शनात भारतीय कलेचा छटा दिसून येतात, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे वास्तुविशारद मोहन वायचळ यांनी येथे केले. ते बिजापुरे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ चित्रकार व्यंकटेश बिदनूर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनात प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी एम. जे. मकानदार, ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे, आदी उपस्थित होते.वायचळ म्हणाले, कर्नाटकातील जी चित्रशैली आहे, तिला छेद देणारी बिजापुरे यांची चित्रे आहेत. आधुनिक स्त्रीची वैशिष्ट्ये, भारतीय कलेची विविध रूपे साकारून त्यांमध्ये प्रेम, वात्सल्य यांची जपणूक केली आहे.प्रत्येक चित्राला आधुनिकतेचा बाज आहे. बिजापुरे यांच्या प्रत्येक चित्रामध्ये कलर हार्मनीचे चांगले मिश्रण झाले आहे. प्रत्येक चित्रात ग्रामीण बाज दिसून येतो, असे व्यंकटेश बिदनूर यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनात बिजापुरे यांच्या पुरातन काळातील समकालीन १५ चित्रांचा समावेश आहे. त्यांचे हे कोल्हापुरातील पहिलेच चित्रप्रदर्शन पहिलेच आहे. यापूर्वी बेळगाव, बंगलोर, म्हैसूर, हुबळी, गुलबर्गा, धारवाड या शहरांत २५ हून अधिक चित्रप्रदर्शने त्यांनी भरविली असून, उद्या मंगळवारी प्रदर्शनाचा अंतिम दिवस आहे.‘वाचनकट्टा’ संकल्पक युवराज कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सलीम कोटबागी, युसूफ नदाफ, सुमेर कोटबागी, सुफियान बिजापुरे, जुमेर कोटबागी, आदी उपस्थित होते. एम. जी. मकानदार यांनी आभार मानले.